वडिलांचा अंगुलीनिर्देश : का केली नाही पोलिसांनी अटक?अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रमात घडलेल्या नरबळीच्या प्रयत्नातील तीन आरोपींपैकी मुख्य आरोपी असलेल्या सुरेंद्रचे वडील रमेश मराठे यांनी आश्रमातील कर्मचारी चरण चटुले याच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा येथे राहणाऱ्या रमेश मराठे यांनी शनिवारी 'लोकमत'शी संवाद साधला. त्यांनी कुण्या मीडियाशी संवाद साधण्याचा हा प्रथम प्रसंग होय. सुरेंद्रच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्रला पोलिसांनी अटक केली. तथापि माझ्या मुलाचा आश्रमाशी कवडीचाही संबंध नाही. आम्ही वर्धा जिल्ह्यात वास्तव्याला आहोत. मुलगा तिकडे उत्तम स्वयंपाकी म्हणून प्रसिद्ध होता. त्याला बऱ्यापैकी मिळकत होती. आश्रमात काम करण्याची ना त्याची इच्छा होती, ना त्यासाठी त्याने कधी प्रयत्न केले होते. आश्रमातील लोकांनीच त्याचा पत्ता मिळविला. त्याला आश्रमात वास्तव्याला ये, अशी गळ घातली. काही जणे येऊन त्याला घेऊन गेले, अशी माहिती देतनाच चरण चटुले याचाच आग्रह अधिक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आश्रमात सुरेंद्र फेब्रुवारी महिन्यात कार्यरत असताना त्याने मुलांसाठी केलेल्या भाजीत कुणीतरी पाणी घातले. त्यामुळे भाजी बेचव झाली. आरोप सुरेंद्रवर आला. न केलेल्या कृत्याचा आरोप आल्यामुळे सुरेंद्र नाराज झाला. आश्रमातील सर्व जबाबदारी कायमची सोडून तो परत गावी आला. त्यानंतर त्याला आश्रमातील लोकांनी पुन्हा नेले. नेण्यासाठी पराकोटीचा आग्रह झाल्यामुळे सुरेंद्रने चटुले याला एक नेमका प्रश्न विचारला होता. आश्रमात यापूर्वी घडले तसे काही घडलेच तर तुम्ही जबाबदारी स्वीकारणार काय, असा तो प्रश्न होता. त्यावेळी चटुले यांनी जबाबदारी स्वीकारण्याची पूर्ण तयारी दाखविली; परंतु रित्या हाती जाणे पसंत केले नाही. सुरेंद्रसाठी इतका आग्रही असणारा, सुरेंद्रला आश्रमाचा रस्ता दाखविणारा, सुरेंद्रच्या शिरावरच्या आरोपांची जबाबदारी स्वीकारण्याचा शब्द देणाऱ्या चटुले याला याप्रकरणी बरेच काही माहिती असू शकते, असा होरा सुरेंद्र मराठे याच्या वडिलांचा होता. पोलिसांना पारदर्शक आणि वेगवान तपास करावयाचा असेल तर, त्यांनी चटुलेला आजतागायत अटक का केली नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. आश्रमाने मुलाच्या हक्काचे २४ हजार रुपये दिले नाहीत. मागितल्यावर प्रकरणाचा निर्णय लागेल त्यावेळी देऊ, असे उत्तर मिळाले, असेही रमेश मराठे यांनी 'लोकमत'ला सांगितले.
'चटुलेकडे बरीच गुपिते'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 23:59 IST