लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभेची निवडणूक आता रंगात येऊ लागली आहे. अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे निश्चित 'व्होट बँक' नसल्यामुळे त्यांना ही निवडणूक जड जाईल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु या पाठिंब्यामुळेच दोन्ही काँग्रेस पक्षांतील अनेक नेत्यांची मने दुखावली आहेत. पक्षापेक्षा व्यक्ती मोठी कशी, नवनीत आणि रवि राणा यांच्या दावनीला पक्ष बांधले गेलेत काय? या मुद्यांवरून दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना भंडावून सोडले आहे. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना आघाडीमध्ये उद्भवलेली ही बेदिलीची स्थिती नवनीत यांच्यासाठी मारक ठरणारी आहे.नवनीत राणा यांचे राजकीय मार्गदर्शक त्यांचे पती रवि राणा हे आहेत. युवा स्वाभिमानी हा त्यांचा स्वत:चा राजकीय पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीचा आवाका मोठा आहे. राणा आणि त्यांची चमू लोकसभेचा हा व्याप पेलण्यासाठी अपुरे ठरत आहेत. निवडणुकीत आवश्यक असलेली कायकर्त्यांची तसेच मतदारांची साखळी विस्कळीत झाल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणच्या आहेत. नियोजनाच्या या अभावाचा फटकाही नवनीत यांना बसण्याची चिन्हे आहेत.नवनीत राणा यांची लढत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्याशी आहे. अमरावतीतून दोनदा खासदार राहिलेल्या अडसुळांना टक्कर देण्यासाठी राणा दाम्पत्य कमी दिवसांत आवश्यक दुवे कसे साधणार, हादेखील प्रश्न महत्त्वाचा आहेच.नेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावनानवनीत यांच्या उमेदवारीनंतर जिल्ह्यातील काही आमदार आणि स्थानिक नेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नवनीत राणा यांचे निवडून येणे आपल्यासाठी डोकेदुखीचे ठरेल, असा भाव या नेत्यांचा आहे. एकाच घरात दोन नेते झालेत की, पुढे ते जिल्ह्यातील इतरांचे नेतृृत्त्व संपवून स्वत:चेच नेतृत्व वाढवत राहतील, या विचाराने विविध नेत्यांच्या मनात पक्के घर केल्यामळे ते नवनीत यांच्या मार्गात छुपे अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे.
Lok Sabha Election 2019; नवनीत राणा यांना निवडणूक अडचणीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:53 IST
लोकसभेची निवडणूक आता रंगात येऊ लागली आहे. अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे निश्चित 'व्होट बँक' नसल्यामुळे त्यांना ही निवडणूक जड जाईल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.
Lok Sabha Election 2019; नवनीत राणा यांना निवडणूक अडचणीची
ठळक मुद्देकसे सांधणार दुवे ? : ‘व्होट बँके’चा अभाव, अनेक नेत्यांची नाराजी