धारणी : येथील बेरोजगारांच्या नाव नोंदणीसाठी असलेले कार्यालय सध्या भगवान भरोसे असून सोमवारपासून या रोजगार, स्वयंरोजगार माहिती व सहाय्य केंद्राला कुलूप लागले आहे.येथे धारणी व चिखलदरा तालुक्यातून दररोज शेकडो बेरोजगार नाव नोंदणीसाठी येतात. परंतु कार्यालयाला कुलूप पाहून त्यांना रिकामे परतावे लागते. केवळ नोंदणीसाठी येणाऱ्या बेरोजगारांना विनाकारण शेकडो रूपयांचा फटका सोसावा लागत आहे. या कार्यालयात मागील दोन वर्षांपासून कनिष्ठ सेवा योजन अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे शिपायाचेसुद्धा पद रिक्त आहे. आतापर्यंत केवळ एका कनिष्ठ लिपिकाने हे कार्यालय उत्तमरित्या सांभाळले. मात्र, मागील सोमवारपासून त्याला परतवाडा येथील कार्यालयात तात्पुरत्या प्रतिनियुक्तीवर बोलविण्यात आल्याने धारणीचे कार्यालय कुलूपबंद झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी संलग्न कामे ठप्प पडली असून बेरोजगारांची होत आहे. धारणी येथील कायमस्वरूपी कनिष्ठ सेवायोजन अधिकाऱ्याचे पद तातडीने भरून शिपायाचीही नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी जनतेद्वारे केली जात आहे. त्याचप्रमाणे स्थानिक कार्यालयात कार्यरत कनिष्ठ लिपिकास धारणीत परत पाठवून येथील कार्यालय पूर्ण आठवडाभर सुरू ठेवावे, अशी मागणीसुध्दा केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
बेरोजगार नोंदणी कार्यालयाला कुलूप
By admin | Updated: November 12, 2014 22:37 IST