श्यामकांत पाण्डेय
धारणी : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे धारणी आणि चिखलदरा या दोन्ही तालुक्यांतील संचालकपद यावेळी सर्वसामान्य उमेदवारासाठी खुले झाले आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यांत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत काँग्रेस पक्षाने या दोन्ही तालुक्यांतील संचालकपद आपल्याकडे राखून ठेवण्यात यश प्राप्त केले होते. परंतु, यंदा काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्ष अशा प्रकारे तिहेरी लढतीची शक्यता सध्या तरी पाहावयास मिळत आहे.
धारणी तालुक्यात एकूण १९ सहकारी संस्था असून, चिखलदरा तालुक्यात १६ सहकारी संस्था आहेत. प्रत्येक संस्थेतर्फे बँक संचालकासाठी प्रतिनिधी म्हणून निवड घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या निवड प्रक्रियेत सध्या तरी काँग्रेस पक्षाने वर्चस्व प्राप्त केल्याचे चित्र आहे.
चिखलदरा तालुक्यातून संचालकपदासाठी काँग्रेस पक्षाचे धारणी तालुकाध्यक्ष महेंद्रसिंह गैलवार आणि दयाराम काळे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, मेळघाटात राजकीय प्रभाव ठेवणारे आमदार राजकुमार पटेल यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्याकडूनसुद्धा संचालकपदासाठी दावेदारी पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिखलदरा तालुक्यात तिहेरी लढतीचे चित्र पाहावयास मिळू शकते.
धारणी तालुक्यातसुद्धा जवळपास हीच स्थिती आहे. तालुक्यातून काँग्रेस, भाजप आणि प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उमेदवारी समोर करण्याची शक्यता असल्याने तिहेरी लढतीची चिन्हे दिसू लागली आहेत. महाआघाडी राज्यात सत्तेवर असल्याने वरिष्ठ स्तरावरून तडजोड करण्याची वरिष्ठांची धडपड सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले बँकेचे संचालकपद यावेळी सर्वसामान्य प्रवर्गासाठी निघाल्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.