अमरावती : सालोरा शिवारातून चोराने १६ हजार ८०० रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. दीपक नरहरी देशमुख (४९ रा. सालोरा बु) यांनी शेतात पीव्हीसी पाईप, स्प्रिंकलर व लोखंडी पाईप ठेवले होते. रविवारी त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना ते साहित्य दिसले नाही. त्यामुळे त्यांनी या घटनेची तक्रार वलगाव पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
0000000000000000000000
जळतापुरातून दुचाकी लंपास
अमरावती : वलगाव ठाण्याच्या हद्दीतील जळतापूर शिवारातून एका इसमाची दुचाकीचोराने लंपास केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. विजय मुरलीधर तायडे (५४, रा. जळतापूर) हे एमएच २७ डब्ल्यू ३२१९ क्रमांकाची दुचाकी घेऊन शेतात गेले होते. त्यांनी शेताच्या बाजूला रोडलगत दुचाकी उभी केली होती. काम आटोपून ते परतले असता, त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी या घटनेची तक्रार वलगाव ठाण्यात नोंदविली.
000000000000000000000000
शेतात काम करणाऱ्या इसमाचा आकस्मिक मृत्यू
अमरावती : शेतात काम करणाऱ्या एका इसमाचा आकस्मिक मृत्यूची झाल्याची घटना नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत रविवारी उघडकीस आली. गजानन पवार (४५ रा. बनारसी) असे मृताचे नाव आहे. संजय श्रीरामजी उमेकर (५४) यांना शेतात काम करणारा गजानन पवार हा एका झाडाजवळ मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी गजाननला मृत घोषित केले. संजय उमेकरच्या माहितीवरून नागपुरी गेट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
0000000000000000000000000000
अवैध दारूसह चाकू जप्त
अमरावती : राजापेठ पोलिसांनी एका अवैध दारूविक्रेत्याला पकडून त्याच्याकडून दारूसह एक चाकू जप्त केला. ही घटना रविवारी न्यू रविनगर परिसरात घडली. पोलीस हवालदार राजेश पाटील यांचे पथक न्यू रविनगरात पेट्रोलिंग करीत असताना, त्यांनी सुनील राजेश शुक्ला याची झडती घेतली. त्याच्याकडे अवैध दारू तसेच चाकू आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला.