तिवसा : सोमवार, १६ ऑगस्ट रोजी शहरासह परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. यात रात्री ११.४५ वाजतार्म्यान सुरवाडी येथील एका लिंबाच्या झाडावर वीज कोसळल्याने काही क्षणासाठी नागरिकांनी जीव मुठीत घेऊन घरात आसरा घेतला. विजेमुळे झाडाची चक्क सालपट निघाल्याचे दृश्य आज सकाळी पहायला मिळाले. मात्र यात अनेक घरगुती उपकरणे निकामी झाली.
दहा दिवसापासून पावसाने दडी मारली होती. सोमवार १६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजतादरम्यान बरसलेल्या पावसामुळे तिवसा शहरासह सुरवाडी, तसेच तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अशातच तिवसा तहसील कार्यालयानजीकच्या सुरवाडी येथील संजय प्रभाकर ठाकरे यांच्या आवारातील लिंबाच्या झाडावर रात्री ११.४५ वाजता जोरदार आवाजात वीज कडाडून पडली. विजेच्या स्पर्शाने झाडाची चक्क सालपटे ओरखडून निघाल्याचे दृश्य १७ ऑगस्ट रोजी परिसरातील नागरिकांनी पाहिले. एवढेच नव्हे तर सुरवाडी येथील अनेक नागरिकांच्या घरची विद्युत उपकरणेसुद्धा यात निकामी झाल्याचे अनेक नागरिकांनी बोलताना सांगितले.