दोन कुत्री एक बकरी पळविली, चिखलदराच्या व्हीव्हीआयपी विश्रामगृह परिसरात वावर
नरेंद्र जावरे
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व्हीव्हीआयपी विश्रामगृह परिसरात गत आठवड्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्री २ वाजता येऊन माठातील गार पाणी पिऊन हा बिबट आपली तृष्णा भागवीत आहे. त्यामुळे जंगलातील पाणवठे आटले का, असा प्रश्न निर्माण झाला असून त्याने एक बकरी व दोन कुत्री पळवून नेल्याने परिसरात दहशत पसरली आहे.
चिखलदरा पर्यटन स्थळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर प्लेटो परिसरात व्हीव्हीआयपी विश्रामगृह आहे. काही दिवसांपासून या विश्रामगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने व कोरोना नियम पाहता येथील खोल्यांचे आरक्षण बंद आहे. विश्रामगृहात येणाऱ्या पाहुण्यांच्या सेवेसाठी खानसामा व चौकीदार राहतात. त्यांचे शासकीय निवासस्थान या विश्रामगृह परिसरात आहे. आठवडाभरापासून खानसामा शेख मोहसीन शेख मोबीन राहत असलेल्या निवासस्थानाला लागून त्यांनी एक पिण्याच्या पाण्यासाठी माठ भरून ठेवला आहे. मध्यरात्री दोन वाजतानंतर तेथे बिबट येऊन पाणी पित आहे. बिबट्याच्या या सततच्या आगमनाने परिसरात दहशत पसरली आहे. गतवर्षी याच विश्रामगृहाच्या भिंतीवरून थेट वाघोबाने उडी घेतल्याचा प्रकार उघड झाला होता. कार्यरत चौकीदाराने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले होते. येथे अस्वलांचे दर्शन नेहमीचे झाले असताना आठवड्याभरात एक बकरी व दोन कुत्री या बिबट्याने पळविली. तर नजीकच्या एका खासगी हॉटेलातील श्वानांवर झडप घेताच दोघांच्या झटापटीत श्वानाने पळ काढला. त्यात तो जखमी झाला.
बॉक्स
पाणवठे कोरडे पडले ?
उन्हाळ्याच्या दिवसात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील पाणवठ्यांची तपासणी करून त्यामध्ये वन्य प्राण्यांसाठी पाणी भरून ठेवण्यात येते. नैसर्गिक व कृत्रिम असे अनेक पाणवठे जंगलात तयार करण्यात आले आहेत. गत आठवड्याभरापासून बिबट्या गार पाण्याच्या माठातील पाण्याने तृष्णा भागवीत असल्याने जंगलातील पाणवठे कोरडे पडले की बिबट्याला गारेगार पाण्याची सवय लागली, अशी चर्चा केली जात आहे.
बॉक्स
परिसरात पिंजरा लावणार
व्हीव्हीआयपी विश्रामगृह पाहता त्यादृष्टीने सुरक्षितता म्हणून चिखलदरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर यांनी सदर प्रकार व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सांगितला. त्यावर आवश्यकता भासल्यास त्याला कैद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोट
विश्रामगृह परिसरात गत आठवड्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बकरी, श्वानांची शिकार करण्यासह माठातील थंड पाणी पिण्यासाठी मध्यरात्री दोन वाजतानंतर हा बिबट येतो.
- शेख मोहसीन शेख मोबीन,
खानसामा, विश्रामगृह चिखलदरा
------------