रहिवासी धास्तावले : परिसरातून श्वान गायबअमरावती : वीरळ वस्तीचा भाग असलेल्या गोविंदनगरात गुरुवारी सकाळी बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले. परिसरातील श्वान अचानक का गायब होवू लागले, हे गुढ आता उकलले आहे. नागरिक चिंतेत आहेत. आनंदवन या अपार्टमेंटनजीकच्या कच्च्या मार्गावर बुधवारी रहिवाशांना पहाटे बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले. विद्यापीठालगतचा हा भाग जगंलाला लागूनच असल्याने तो हिरवळीने व्यापला आहे. परिसरातील नाल्यामध्ये पाणी आहे. एक तळेही तेथे साचले आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन्यप्राणी अनेकदा नागरी वस्तीत दृष्टीस पडले आहेत. विद्यापीठाच्या तलावावर तर अनेकदा बिबट आढळून आला आहे. त्यामुळे गोविंदनगरातही बिबट अन्न-पाण्याच्या शोधात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवारी आनंदवन अपार्टमेंटमधील रहिवासी संदीप देशमुख, हितेंद्र जटाले व चौकीदार गवई यांना परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आलेत. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना आढळून आलेल्या पायांच्या ठशांची पाहणी करून ते कोणत्या वन्यप्राण्यांचे आहेत, हे तपासू, अशी प्रतिक्रिया वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी दिली.
गोविंदनगरात आढळले बिबट्याच्या पायांचे ठसे
By admin | Updated: April 28, 2016 00:06 IST