डिजिटल ग्राम : सोनारखेड्याची ओळख अमरावती : केंद्र सरकारच्या निश्चलनीकरण धोरणांतर्गत जनतेनी सर्व आर्थिक व्यवहार कॅशलेस पद्धतीने करावे, असे आवाहन देशपातळीवर करण्यात येत आहे. याची अंमलबजावणी म्हणून जिल्ह्यातील पहिल्या कॅशलेस सुविधेचा शुभारंभ भातकुली तालुक्यातील ग्राम सोनारखेडा येथे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. सेंट्रल बँक आॅफ इंडिया व सोनारखेडा ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी सरपंच शिल्पा मातकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक क्रांती काटोले, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक अमरकुमार सिन्हा, अग्रणी बँकेचे मॅनेजर रामटेके, वाठोडा शुक्लेश्वर शाखेचे शाखाव्यवस्थापक तंबाखे तसेच सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी चौबे, ग्रामसेवक संजय चव्हाण, ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना हारार्पन व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सोनारखेडा गावातील बँक खातेदाराच्या खात्यात एटीएम कार्ड स्वॅप करून पैसे ट्रान्सफरचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी गित्ते यांच्याहस्ते करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया कॅशलेस प्रणालीअंतर्गत उपस्थिताना करुन दाखविण्यात आली. भातकुली तालुक्यातील सोनारखेडा हे जिल्ह्यातील पहिले डिजिटल ग्राम व कॅशलेस सुविधा वापरणारे गाव असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात गावातील तीन नवीन खातेधारकांना बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड आणि सात बचत गटांना एक लक्ष रुपये कजार्चा धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कॅशलेस प्रणालीचा उपयोगाने व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आहे. सेंट्रल बँक आॅफ इंडिया बँकेचे बंकीग, यूपीआय, एनईएफटी, युनीफाय, आरटीजीएस आदी डिजिटल सुविधांच्या सहायाने बँकेचे सर्व व्यवहार तत्काळ करता येतात, अशी माहिती क्षेत्रीय प्रबंधक श्री सिन्हा यांनी दिली. यावेळी एलडीएम रामटेके, बँक अधिकारी चौबे , सरपंच श्रीमती मातकर यांची भाषणे झालीत. (प्रतिनिधी)
पहिल्या कॅशलेस सुविधेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
By admin | Updated: January 1, 2017 00:44 IST