यशोमती ठाकू र यांची स्वप्नपूर्ती : देवी रूख्मिणीच्या माहेरचा चेहरा-मोहरा पालटणारअमरावती : वर्धा नदीच्या तिरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले रुक्मिणी मातेचे माहेर कौंडण्यपूर सर्वदूर परिचित आहे. या गावाला ऐतिहासिक परंपरा, प्राचीन महत्त्व असताना ते विकासापासून दूर राहिले. मात्र, पंढरपूरच्या धर्तीवर कौंडण्यपूरचा विकास व्हावा, यासाठी आ. यशोमती ठाकूर यांनी कमालीची धडपड चालविली आहे. ५५ एकर परिसरात पालखी रिंगण सोहळा, देखणे पर्यटनस्थळ, भव्यदिव्य प्रवेशद्वार, बालउद्यान, रिसोर्ट, भक्तनिवास, पार्किंग, बोटिंग, तीन घाटांची निर्मिती, विठ्ठल- रुक्मिणीचे स्टॅच्यू, रस्यांचे जाळे विणताना कौंडण्यपूरचे रुपडं पालटणार आहे. विकास म्हणजे चार भिंती नव्हे तर पुढील ५० वर्षांचे नियोजन कसे असावे, ही संकल्पना आ. यशोमती ठाकूर यांनी कौंडण्यपूर विकास आराखड्यातून सिद्ध केले. ‘टुरिझम डेव्हलपमेंट’ या संकल्पनेवर आधारित कौंडण्यपूर विकासाची पायाभरणी करण्यात आली. पंढरपूर ते कौंडण्यपूर ही दोन पौराणीक स्थळे एकमेकांशी जोडण्यासाठी आ. ठाकूर यांनी स्वप्नपूर्तीकडे वाटचाल चालविली आहे. कौंडण्यपूर विकास आराखड्यासाठी १३ कोटी ४४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याच विकास आराखड्यांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग २० कोटींतून अंतर्गत व बाह्य रस्ते, पूल, विश्रामगृह आदी विकासकामे विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणात करीत आहेत. राज्य शासनाने पंढरपूरच्या धर्तीवर कौंडण्यपूरचा विकास करावा, यासाठी आ. यशोमती ठाकूर यांनी शासनस्तरावर केलेले प्रयत्न आता फळाला आले आहेत. विशेष म्हणजे माजी आ. भय्यासाहेब ठाकूर यांनी कौंडण्यपूर तीर्थक्षेत्राचा विकास करताना त्यांनी सुचविलेल्या नावीण्यपूर्ण संकल्पना, विकास कामांना या आराखड्यात स्थान देण्यात आले आहे. विश्वास मढाऊ हे कौंडण्यपूर विकास आराखड्याचे वास्तुशिल्पकार आहेत. मढाऊ यांनीच शेगाव येथील आनंद सागर ही भव्यदिव्य वास्तू साकारण्याची किमया केली आहे. परंतु वर्धा नदीच्या तिरावर वसलेले कौंडण्यपूर हे भविष्यात विदर्भात सर्वात देखणे आणि मोठे पर्यटनस्थळ नावारुपास येईल, अशी पायाभरणी आ. यशोमती ठाकूर यांनी केली आहे. पंढरपूरच्या धर्तीवर कौंडण्यपूर येथे ४ हजार मीटर पालखी रिंगण सोहळ्याचे मैदान, भव्यदिव्य प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, पार्किंग, पर्यटकांसाठी विसावा, उद्यान, बैठक व्यवस्था, रिसोर्ट, भक्तनिवास आणि नदीच्या तिरावर तयार करण्यात आलेले घाट हे येत्या काळात भक्तांसाठी पर्वणी ठरेल. पंढरपूरच्या धर्तीवर रुख्मिणीच्या माहेरी कौंडण्यपूर येथे मोठा आषाढी उत्सव साजरा करण्याचे मानस आ. यशोमती ठाकूर यांचे आहे. जिल्ह्यातून नव्हे, तर संपूर्ण विदर्भातून रुक्मिणी मातेच्या पालखीला मान राहणार आहे. त्याअनुषंगाने विकास आराखड्यात विविध कामे आ. यशोमती ठाकूर, माजी आ. भय्यासाहेब ठाकूर यांनी सुचविली आहेत. (प्रतिनिधी)
५५ एकरात साकारणार कौंडण्यपूर पर्यटन स्थळ
By admin | Updated: August 3, 2016 00:18 IST