मनपाचा इशारा : बायोगॅस प्रकल्प उभारणी आवश्यकअमरावती : घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावणाऱ्या हॉटेलवर कारवईचा बडगा उगारण्यात येणार आहे. बायोगॅस आणि तत्सम प्रकल्प उभारणीला खो देणाऱ्या हॉटेल्स तथा मंगल कार्यालयाच्या किचनला सिल करण्यात येणार आहे. आगामी आठवड्यातही कारवाई केली जाणार असल्याचे यंत्रणेला म्हटले आहे. महापालिका क्षेत्रात अंदाजे ५३० हॉटेल, मंगल कार्यालये, खानावळी व इतर आस्थापना आहेत. ८ एप्रिल २०१६ रोजी पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्या अधिसुचनेनुसार त्या आस्थापनेतून निघालेल्या संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधिताची आहे. या सर्व आस्थापनेमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून सुका कचरा मनपा नियुक्त कचरा वेचकाला देण्याबाबत किंवा त्यांच्यामार्फत विल्हेवाट लावण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. ओल्या कचऱ्याच्या शास्त्रीय विल्हेवाटीसाठी खत किंवा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देश वारंवार देण्यात आले.महापालिका आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या नेतृत्वात पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांच्या अधिनस्थ यंत्रणेने संबंधित आस्थापना धारकांना नोटीस जारी केल्यात. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्या अनुषंगाने ओल्या कचऱ्याकरिता खत किंवा बायोगॅस प्रकल्प त्वरित बसविण्यासंदर्भात दोन वेळा नोटीसेस देण्यात आल्या. तथापि त्यानंतरही खत किंवा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित न करणाऱ्या आस्थापनेमधील ‘किचन’ महापालिकेतर्फे सील करण्यात येणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी अतिरिक्त आयुक्तांनी हॉटेल, खाणावळीधारकांची बैठक घेऊन त्यांना प्रकल्पाची आवश्यकता पटवून सांगितली. मात्र त्यानंतरही महापालिकेच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)खत किंवा बायोगॅस प्रकल्प न उभारणाऱ्या हॉटेल, खानावळी आणि मंगल कार्यालयातील ‘किचन’ सील करण्यात येतील. कारवाईला पुढील आठवड्यात प्रारंभ होईल. - सोमनाथ शेटे, अतिरिक्त आयुक्त, मनपा.
-तर किचनची जप्ती
By admin | Updated: October 22, 2016 00:10 IST