अमरावती: ओळखीतील युवतीने लग्नाचा प्रस्ताव मान्य करावा, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यासाठी एका विवाहित पुरुषाने तिचे वाहनातून अपहरण केले. त्यानंतर एका धाब्यावर नेऊन चाकूचा धाक दाखवून तिचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी शहरात घडली.
पोलीस सूत्रांनुसार, सुशील देविदास मेश्राम (३५, रा. दत्तात्रयनगर, यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी युवती व आरोपी हे एकमेकांचे परिचित असून, त्यांचे फोनवर मागील दोन वर्षापासून बोलणे सुरू होते. परंतु सद इसम विवाहित व एका मुलाचा बाप असल्याचे युवतीला समजले. दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. मोबाईल क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. त्यामुळे चिडलेल्या सुशीलने ती राहत असलेल्या होस्टेलवर चार वेळा येऊन तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू माझ्याशी बोल, असे सांगितले.
लग्नाला होकार न दिल्याने सुशीलने होस्टेलवर येऊन तिला शिवीगाळ केली तसेच जबरीने चारचाकी वाहनात डांबले. चाकूच्या धाकावर तिला चांदूर रेल्वे मार्गे देवगाव येथील धाब्यावर नेले. येथे त्याने दोघांनाही संपविण्याची धमकी दिली. यानंतर रात्री अडीच वाजताच्या सुमारास अमरावतीला आणून सोडले, अशी तक्रार सदर युवतीने नोंदविली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५२, ३५४ (ड), ३६३, ३४२, २९४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास ........................ पोलीस करीत आहेत.