अमरावती : दोन दिवसापूर्वी महादेवखोरी व रिंगरोड स्थित ढाब्यावर झालेल्या खुनाची शाई वाळते न वाळतेच रविवारी मोतीनगरात एका २३ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. अंशुल बाळू इंदूरकर (२३, रा. कल्याणनगर) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास मोतीनगर भागात त्याचेवर अज्ञात तीन हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला चढविला. त्याचा रात्री ८ च्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने मोतीनगर परिसरात मोठी खळबळ उडाली. २१ ते २५ जुलैदरम्यान घडलेला हा तिसरा खून ठरला आहे. तर, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अंशुल हा एका केस कर्तनालयात कारागीर म्हणून काम करीत होता. रविवार दुकान बंद असल्याने तो घरीच होता. त्याला दुपारी ३ च्या सुमारास तिघांनी फोन करून मोतीनगरात बोलावले. तेथे दुचाकीने आलेल्या तिघांनी त्याच्या खांद्यावर, पाठीवर व कमरेवर सातपेक्षा अधिक वार केले. अंशुलला तेथेच टाकून हल्लेखोरांनी पळ काढला. त्याला रक्तबंबाळ स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला येथीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वृत्त लिहिस्तोवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, तेथे श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. याप्रकरणी तीन हल्लेखोर पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यादृष्टीने वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण्यात ठाण मांडून आहेत.
मृताचा मोबाईल जप्त
फ्रेजरपुरा पोलिसांनी मृताचा मोबाईल जिल्हा सामान्य रुग्णालयात तो उपचार घेत असताना ताब्यात घेतला. घरून निघण्यापूर्वी अंशुलला ज्या नंबरवरून फोन कॉल आलेत, ते ट्रेस करून हल्लेखोरांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. आरोपींचे लोकेशन ट्रेस करण्यात आले आहे.
२१ जुलैपासून रक्तरंजित मालिका
२१ जुलै रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास महादेवखोरी येथे प्रणय सातनुरकर (२२) याचा चाकूने सपासप वार करून खून करण्यात आला. तर, २३ जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास प्रसाद देशमुख या तरुण अभियंत्याला संपविण्यात आले. या दोन घटना ताज्या असताना रविवारी दुपारी पुन्हा एकदा तरुणाला संपविण्यात आले.