अमरावती : दुचाकीचा लॉक उघडण्यासाठी घेतलेली कपाटाची चावी वाकवून व तिथल्या तिथे दुसरी चावी बनवून कपाटातील १८ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. पार्वतीनगर नं. २ मधील महात्मा फुले विद्यालयाजवळ ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी खोलापुरीगेट पोलिसांनी अज्ञात दोघांविरूदध भादंविचे कलम ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, सोमवारी सायंकाळी त्या भागात दोन अनोळखी सरदार आले. चावी बनवून मिळेल, असे ते ओरडत होते. त्यामुळे फिर्यादीच्या घरासमोरील एका महिलेने त्या दोघांना मोपेडची चावी बनविण्यास सांगितले. कपाटाची चावी असेल, तर द्या, असे सांगितल्याने त्या शेजारी महिलेने तक्रारकर्ता इसमाच्या पत्नीला कपाटाची चावी मागितली. ती दिली असता, त्या दोन अज्ञातांनी ती चावी वाकवली. त्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी तुमचे कपाट दाखवा, चावी बनवून देण्याची बतावणी केली. त्यामुळे फिर्यादीच्या पत्नीने त्यांना कपाट दाखविले. त्यांनी कपाटाला दुसरी चावी लावून ते उघडून दाखविले व ते निघून गेले. त्यानंतर कपाटाची पाहणी केली असता, त्यातील ६ हजार रुपये रोख, एक ग्रॅमचा सोन्याचा ओम, कानातील बाली व सोन्याचे मनी असा एकूण १८ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. तो ऐवज त्या दोन अनोळखी व्यक्तींनी चोरून नेल्याची तक्रार सायंकाळच्या सुमारास खोलापुरीगेट पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली.