अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आतापर्यंत ५२ संक्रमित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला असून, आता १० दिवस विद्यापीठ बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी विद्यापीठ कर्मचारी संघाने कुलगुरूंना पत्राद्वारे केली आहे.
विद्यापीठ प्रशासनाने २४ व २४ फेब्रुवारी रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरटी-पीसीआर स्वॅब घेत कोरोना चाचणी केली आहे. यामध्ये दोन दिवसांत ३७ कर्मचारी संक्रमित आढळले असून, अगोदर १५ कर्मचारी बाधित आहेत. एकाच वेळी ५२ कर्मचारी कोरोना संक्रमित असणे ही बाब चिंतनीय आहे. अनेक विभागांत कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी केली नाही, ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. चाचणीनंतर आलेला अहवाल बघता, विद्यापीठात कोरोना संसर्गाचा प्रचंड धोका वाढला आहे. समूह संसर्ग टाळणे आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य जाेपासण्यासाठी १० दिवस विद्यापीठ पूर्णत: बंद ठेवावे, अशी मागणी विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, महासचिव विलास सातपुते यांनी पत्राद्धारे केली आहे. गत तीन दिवसांत २८१ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली असून, एकूण ३७ जण बाधित आढळले आहे. शनिवारी पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.
---------------------------------
कोरोना संक्रमितांची वाढती संख्या बघता, कर्मचारी संघाने विद्यापीठ १० दिवस बंद ठेवावे, असे पत्र दिले आहे. याबाबत तूर्त निर्णय घेण्यात आला नाही. कुलगुरू यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील. गत तीन दिवसांत २८१ चाचण्यांमधून ३७ कर्मचारी बाधित आढळले आहेत.
- तुषार देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ.
----------------------
विद्यापीठात कोरोनाचा समूह संसर्ग होत असून, ही गंभीर स्थिती लक्षात घेता, १० दिवस विद्यापीठ बंद ठेवावे. पुढे १० दिवस कोणत्याही प्रकारचे कामकाज होता कामा नये, असे पत्र दिले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आराेग्यहितासाठी सोमवारपासून विद्यापीठ बंद ठेवावे, अशी मागणी आहे.
- अजय देशमुख, अध्यक्ष, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघ.