कोविड हॉस्पिटलमध्ये पाच दिवसांच्या उपचारानंतर परतल्या घरी, दोन दिवसांत १५ कोरोनामुक्त, आठ दाखल
तिवसा : कोविड-१९ च्या रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या तिवसा येथील कोविड हॉस्पिटलमधून उपचार घेऊन कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. दोन दिवसांत १५ रुग्ण घरी परतले, तर आठ नव्याने दाखल झाले आहेत. सातरगावच्या ८१ वर्षीय कौसल्याबाई सोनोने या पाच दिवसांच्या उपचारानंतर कोविडमुक्त होऊन मंगळवारी घरी परतल्या.
तिवसा येथील कोविड हॉस्पिटलमधून मंगळवारी सहा, तर बुधवारी नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केली. येथील रिकव्हरी रेट चांगला असल्याची बाब पाहायला मिळत आहे. येथे वैद्यकीय अधीक्षक पवन मालुसरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. सोनल ठाकूर यांच्यासह डॉ. सुधीर चक्रनारायण, डॉ. रोशन बोके, डॉ. प्राची वाघाडे, डॉ. सोनम बुले, नर्स ज्योती दवंडे, प्रतीक्षा शेंडे, राधिका लढे, पूजा मोहोड, कोमल प्रधान, पल्लवी नंदनकर, ऐफिया पठाण, वर्षा राठोड, शुभांगी तायडे, प्रज्ञा चावरे, सरोज पखाले, कांचन कुरसंगे, अश्विनी धवणे, सुरेखा वानखडे व अटेंडन्ट संजीवनी खडसे, अलिशा धवणे, हर्षद ब्राम्हणे, श्रेयस खेडकर, आयुष धवणे, मयूर खैरकर, नंदू बेलसरे आदींची यंत्रणा दररोज वेगवेगळ्या शिफ्टमध्ये रुग्णांना आरोग्यसेवा पुरवित आहे. आजवर येथून ३३० रुग्ण बरे होऊन घरी परतले. दररोज चार ते पाच जणांना डिस्चार्ज दिला जात असू, दाखल होणाऱ्यांचे प्रमाण तेवढेच आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.