अमरावती : गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस शिपाई, पोलिस नाईक, हवालदार, सहाय्यक उपनिरीक्षक तथा श्रेणी पोलिस उपनिरीक्षक अशा २१ अंमलदारांना ड्युटी पासवर पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी १४ ऑगस्ट रोजी रात्री ते आदेश काढलेत. यापुर्वी गुन्हे शाखेत कर्तव्य बजावलेले, गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हे शाखेतच असलेले व आलटून पालटून गुन्हे शाखेतच स्वत:ची पदस्थापना करवून घेणाऱ्यांचा त्या ‘रिशफल’ मध्ये समावेश आहे.
यात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनय मोहोड, हवालदार अशोक वाटाणे व माधुरी साबळे व पोलिस नाईक चंद्रशेखर रामटेके यांना गाडगेनगर पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले आहे. तर एएसआय युसुफ सौदागर, शिपाई योगेश पवार व विनोद काटकर यांना राजापेठ ठाण्यात पाठविण्यात आले आहे. एएसआय महेंद्रसिंग येवतीकर, शिपाई निखिल गेडाम व उमेश कापडे हे आता फ्रेजरपुरा ठाण्यात कर्तव्य बजावतील. हवालदार रंजित शेंडोकार व शिपाई रुपेश काळे हे खोलापुरी गेट ठाण्यात सेवा देतील. याशिवाय सुधीर गुडधे यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे. ते छायाचित्रकार म्हणून कर्तव्य बजावतील. पोलीस नाईक नईम कय्युम बेग, शिपाई सिद्धेश देशमुख व सागर ठाकरे यांना नांदगाव पेठ येथे ड्युटी पासवर पाठविण्यात आले आहे. सुरज चव्हाण व मयूर बोरकर हे कोतवाली तर राजिक रायलीवाले तथा गोविंद धानवे यांना वलगाव पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले आहे.
तीन युनिटमध्ये विभागले होते अंमलदार
तत्कालिन पोलीस आयुक्तांच्या काळात गुन्हे शाखेचे तीन युनिट करण्यात आले होते. त्यात गुन्हे शाखा युनिट वन, युनिट टू व पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वातील गुन्हे शाखा प्रशासन या युनिटचा समावेश होता. त्यामुळे गुन्हे शाखेमध्ये ८० पेक्षा अधिक पोलिस अंमलदार तैनात होते.
पोलीस आयुक्तांनी दिले होते रिशफलचे संकेतपोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पदभार स्वीकारताच गुन्हे शाखेसह अन्य सर्व शाखांचा तथा ठाण्यांचा आढावा घेऊन रिशफलचे संकेत दिले होते. त्यानुसार तब्बल २१ पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेतून विविध पोलीस स्टेशनमध्ये पाठविण्यात आले आहे.