वरूड : पुसला येथील जिल्हा परिषद सदस्याचे नाव बातमीत का छापले नाही, असे म्हणत वाहनचालकाने पत्रकार गजानन नानोटकर यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून त्यांना शिवीगाळ केली. हात-पाय तोडण्याची धमकी देण्यात आली. या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
पोलीस सूत्रांनुसार, ग्रामपंचायतीच्यावतीने फवारणी सुरू असताना, उपस्थित राहिलेल्या पदाधिकाऱ्यांमधील जिल्हा परिषद सदस्याचे नाव अनवधानाने सुटले. ही बाब जिल्हा परिषद सदस्याच्या वाहनचालकाच्या जिव्हारी लागली. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता तो घरी धडकला. जिल्हा परिषद सदस्याचा फोटो बातमीत आला, पण नाव छापले नाही. हे योग्य केले नाही, असे वाहनचालक अंकुश उर्फ विक्की विरखरे हा निघून गेला. यानंतर रात्री ११ च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत एका युवकासोबत त्याने नानोटकर यांच्या घरी जाऊन दरवाजावर लाथा मारल्या आणि तू बाहेर चाल, तुझे हातपाय तोडल्यावर सांगतो कसे नाव छापले नाही, असे सुनावले. या घटनेची तक्रार गजानन नानोटकर यांनी शेंदूजनाघाट पोलीस ठाण्यात दिली. यावर पोलिसांनी भादंविचे कलम ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली. या घटनेचा विदर्भ प्रेस क्लबच्यावतीने निषेध व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.