अमरावती : कोरोना परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार वर्गोन्नती देण्यासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
यंदा कोरोनामुळे पहिली ते चौथीच्या शाळा वर्षभर सुरू होऊ शकल्या नाहीत. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कमी कालावधी करिता प्रत्यक्ष वर्ग अध्यापन शक्य झाले नाही. कोरोना काळात विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने विविध माध्यमांच्या सहाय्याने ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचे प्रयत्न केले. ते अद्यापही सुरूच आहेत. बहुतांश शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन केले आहे. मात्र, अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन केले नाही. त्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने वर्गोन्नतीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
बॉक्स
अशा आहेत वर्गोन्नतीबाबतच्या सूचना
१) यावर्षी ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत नियमित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा.
२) शिक्षकांनी विविध साधन तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर शंभर गुणांमध्ये करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांची श्रेणी निर्धारित करण्यात यावी.
३) ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक संकलित मूल्यमापन करणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांना आरटीईच्या कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नती करण्यात यावी.
४)कमी श्रेणी मिळालेल्या विद्यार्थी तसेच आरटीई कायद्यानुसार वयानुरूप दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करावे.
५) यावर्षी नव्याने कोणतेही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रकारे मूल्यमापन करण्यात येऊ नये.
६) सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक संचयी नोंदपत्रक इत्यादी अभिलेखे नियमित वेळेत पूर्ण करावी. त्यानंतर स्थानिक परिस्थिती अनुरुप वितरित करावे.
७)सदर सूचना राज्य शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू आहे.