वरूड : शहरात सायंकाळचे पाच वाजले की, सायरन वाजतो. त्यानंतर पोलीस आणि नगर परिषदेचे पथक कारवाईसाठी सरसावते आणि घराबाहेर असलेल्या हजारो लोकांची एकच धावपळ उडते. २३ फेब्रुवारीला गव्हाणकुंड येथील एका ६० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला. मंगळवारी ३१, तर बुधवारी १६ कोरोना पॉझिटिव्ह आले. तरीही लोकांचा मुक्त संचार आहे, तर कंटेनमेंट झोन कधीचे हद्दपार झाल्याचे चित्र आहे.
कोरोना संसर्ग अमरावती शहरासह तालुक्याच्या ठिकाणीदेखील पसरत आहे. २३ फेब्रुवारीला गव्हाणकुंड येथील ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. संक्रमणाचा मोठा ब्लास्ट होण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. परंतु, आपत्ती व्यवस्थापानाची भरारी पथके दिसत नाहीत. नागरिकांचा बिनधास्त संचार असतो . याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.