अमरावती/ अचलपूर : अमित बटाऊवाले हत्याकांडातील इशानअली ऊर्फ इशान शूटर याला बुधवारी अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. पोलिसांनी मंगळवारी परतवाड्याजवळील कठोरा नाका येथे शिताफीने अटक केली होती. दरम्यान या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले त्याचे वडील मोहन बटाऊवाले यांना दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आणले असून त्यांच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली आहे. अमित बटाऊवाले हत्याकांडात बारुद गँगचे एकूण ११ आरोपी असून मंगळवारी सायंकाळी अचलपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला कठोरा नाक्यावरील दवाखान्याजवळून सापळा रचून अटक केली. तो पळून जाण्याच्या तयारीत होता. आज पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता ९ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मोहन बटाऊवाले यांना दोन दिवसांपूर्वी नागपूर येथून अचलपुरात आणले. या हल्ल्यात मुलगा अमित ठार झाल्याचे समजताच ते ओक्साबोक्शी रडू लागले. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता १० झाली असून एक आरोपी फरार आहे. याप्रकरणी आणखी काय वळण येते, याकडे अचलपूरवासियांना उत्सुकता आहेच. (प्रतिनिधी)
ईशान शूटरला पाच दिवसांची कोठडी
By admin | Updated: September 3, 2015 00:05 IST