लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : मागील पंचवार्षिक मध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती, भूखंड व इतर आर्थिक अनियमिततेचा ठपका असलेली अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली. बांधकाम व इतर कामांमध्ये बाजार समितीच्या निधीत अफरातफर व नुकसान होत असून अनेक खोटी देयके, ठराव घेतल्याची सात मुद्द्यांवरील लेखी तक्रारच बाजार समितीमध्ये कार्यरत पर्यवेक्षक अमरदीप वानखडे यांनी केली. यावर जिल्हा उपनिबंधकांनी समिती गठित केली आहे.
तक्रारीनुसार, बाजार समितीच्या मुख्य यार्ड आवारातील अडते-व्यापारी गाळ्यांसमोरील टिन शेड बांधकाम व पथ्रोट उपबाजार आवारातील शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामामध्ये कलम १२ (१) नुसार प्रस्तावाऐवजी पाच वर्षांअगोदर घेतलेला ठराव सादर केला. अशीच इतरही नियमबाह्य कामे केल्याचे आरोप लेखी तक्रारीत करण्यात आले. सभापती व काही संचालकांवर हा ठपका ठेवण्यात आला आहे.
नियमबाह्य रंगरंगोटी! बाजार समिती कार्यालयाच्या बाहेरच्या भितीची रंगरंगोटी केली. काम कोणी केले, कुठल्या दुकानातून साहित्य आणले, मजुरांना किती रक्कम दिली गेली, किती स्क्वेअर फूट काम झाले, कुठल्या दराने काम झाले आदी चौकशीची मागणी आहे.
मुरूम खाल्ला कोणी? तपासणी करा बाजार समितीमध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्यात मुरुम टाकण्यात आला. वाहने कमी, पण दुप्पट दाखवून जादा देयके काढण्यात आली. त्यासाठी पूर्वपरवानगी किंवा ठराव घेतलाच नाही. संबंधित वाहनांची रॉयल्टीच्या खदान मालक यांच्याकडे असलेल्या नोंदी तपासण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली.
चौकशी समिती गठित जिल्हा उपनिबंधकांना तक्रार मिळताच त्यांनी चौकशी करण्यासाठी मोर्शी येथील सहायक निबंधक राजेश भुयार, सहकार अधिकारी सुधीर मानकर व लेखापरीक्षक मोबीन मोहम्मद खान अशी तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली.
"प्रशासकीय कामासंदर्भात तक्रारीच्या चौकशीसाठी अधिकारी आले आहेत. चौकशी सुरू आहे. बाजार समितीतर्फे आवश्यक ती सर्व कागदपत्रे त्यांना दाखवली जात आहेत." - योगेश चव्हाण, सचिव, कृषिउत्पन्न बाजार समिती, अचलपूर