आढावा : सुरक्षा,कक्षसेवक,स्वच्छता कर्मचाऱ्याच्या कामावर ताशेरेलोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुरवस्था आ.सुनील देशमुखांनी आरोग्य मंत्र्यांसमोर मांडल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांची तारांबळ उडाली. सीएस अरुण राऊत यांचे कामकाज बरे आहे. मात्र, प्रशासक म्हणून त्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे आ. देशमुखांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासमोर स्पष्ट केले. आरोग्य मंत्री दीपक सावंत गुरुवारी अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यांनी सर्वप्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आढावा घेतला. सावंत यांनी ओपीडी कक्षाची पाहणी करून काही रुग्णांची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी सिटीस्कॅन कक्षातील नवीन मशिनची पाहणी करून जिल्हा शल्यचिकित्सकांना योग्य ते निर्देश दिलेत. बालरोग विभागाची पाहणी करून तेथे दाखल असणाऱ्या चिमुकल्याच्या आई-वडिलांशी चर्चा केली. त्यानंतर सावंत यांनी आरोग्य अभियान कार्यालयाचे फीत कापून उद्गाटन केले. त्यानंतर सावंत यांनी टेलीमेडिसीन कक्षाची पाहणी करून जिल्हा शल्य चिकित्सकांकडून रुग्णालयीन कामकाजावर चर्चा केली. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, आ.सुनील देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. चर्चेदरम्यान आ.देशमुखांनी परिचारिकांच्या समस्येकडे लक्ष वेधून त्यांनी आरोग्य मंत्र्यांसमोर काही मुद्दे मांडले. वॉर्डामधील परिचारिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मांडला. रात्रकालीन ड्युटीत अन्टेंडन्ट, सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचारी उपस्थित नसून हे सर्व कर्मचारी विनकामाचे वेतन शासनाकडून उकळत असल्याचे आ.देशमुखांनी आरोग्य मंत्र्यांना सांगितले. यावेळी अधिसेविका मंदा गाढवे यांनीही आरोग्य मंत्र्यांना परिचारिकांच्या समस्या अवगत करून दिल्यात. यावर त्यांनी उपाययोजना सांगत कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे सीएस राऊत यांना सांगितले. त्यानंतर सावंत यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे कूच केली. पीडीएमसीतील दोषींना शिक्षा मिळेलच ४आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना मीडिया प्रतिनिधींनी पीडीएमसीतील नवजात शिशुंच्या मृत्यूप्रकरणाबाबत शासनाची भूमिका काय राहणार याबाबत विचारणा केली असता कोणालाही स्पेअर केले जाणार नाही. कुणाच्याही हातून चूक झाली असेल किंवा हलगर्जीपणा झाला असेल, तर त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेलच, असे सावंत यांनी सांगितले. पालकांचे निवेदन ४नवजात शिशुंचे पालकांनी विश्रामगृह येथे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांची भेट घेणार होते. मात्र, तत्पूर्वीच आरोग्यमंत्री अमरावतीतून निघून गेले. त्यामुळे पालकांनी विश्रामगृहात आरोग्य मंत्र्यांच्या स्वीयसहायकांकडे निवेदन सोपविले. शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याबाबत व या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून संबंधित दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याबाबतचे ते निवेदन होते. आरोग्यमंत्री पोहोचण्यापूर्वीच इर्विन चकाचक ४जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुरवस्था दरवेळी चर्चेत असते. मात्र, मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा असल्यास इर्विन रुग्णालय चकचकीत केले जाते. गुरुवारी आरोग्यमंत्री येण्यापूर्वीच इर्विन चकाचक असल्याचे आढळून आले. त्यांच्या आगमनापूर्वीच इर्विनमधील बहुतांश दुरवस्था सुधारण्यात आल्याचाही मुद्दा काही जणांनी आरोग्यमंत्र्यांसमोर मांडला.
देशमुखांनी आरोग्य मंत्र्यांसमोर मांडली इर्विनची दुरवस्था
By admin | Updated: July 7, 2017 00:22 IST