लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डींच्या भूमिकेची चौकशीसाठी अपर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षेखाली गठित चार सदस्यीय चौकशी पथक बुधवारी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळी १० ते १ असे तब्बल तीन तास होते. धारणी पोलिसांनी दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची या पथकाने तपासणी केली.गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित करण्यात आलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध याप्रकरणी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे तसेच सध्या तो कारागृहात बंदिस्त आहे. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरही गुन्हे दाखल व्हावेत, असा रेटा वाढत आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने रेड्डींच्या भूमिकेची चौकशीसाठी प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षेखाली प्राथमिक चौकशी पथक गठित केले. या पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात २१ ते २४ एप्रिल दरम्यान चमूने दीपाली प्रकरणाशी निगडीत लोकांचे बयाण नोंदविले. २६ एप्रिल रोजी प्रज्ञा सरवदे अमरावतीत दाखल झाल्या. याच दिवशी दीपाली यांच्या पतीने नोंदविलेल्या बयाणांचे ‘क्रॉस चेकिंग’ करण्यात आले. २७ एप्रिल रोजी सरवदे यांनी हरिसाल गाठले. वनकर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. दीपाली यांचे शासकीय निवासस्थान तसेच काही ठिकाणी भेटी दिल्या. स्थानिकांशी संवाद साधला. आता सरवदे यांना ३० एप्रिलपर्यंत राज्य शासनाकडे चौकशी अहवाल सादर करावा लागेल. त्या बुधवारी सकाळी ९ वाजता मुंबईकडे रवाना झाल्या. तथापि, उर्वरित चमूने एसपी कार्यालय गाठले व प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली.
प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळलेआयपीएस डॉ. प्रज्ञा सरवदे यांचे चौकशी पथक २१ ते २८ एप्रिल या दरम्यान अमरावती, हरिसाल येथे दौऱ्यावर होते. मात्र, या आठ दिवसांत प्रसारमाध्यमांशी कुणीही बोलले नाही.जे काही चौकशीत असेल, तो अहवाल राज्य शासनाला सादर केला जातील, एवढेच टिपिकल उत्तर पथकाचे होते.