तालुका भाजपचा इशारा, गोपाल तिरमारे यांचे उपोषण
चांदूर बाजार : स्थानिक नगरपालिकेसमोर १५ मार्चपासून पंतप्रधान आवास योजनेतून रखडलेल्या घरकुल कामाच्या प्रक्रियेविरुद्ध नगरसेवक गोपाल तिरमारे यांच्या अन्नत्याग आंदोलनाची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा भाजपतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप तालुकाध्यक्ष मुरली माकोडेंसह कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदनातून दिला आहे.
चांदूर बाजार नगरपालिका प्रशासनातर्फे जनतेच्या हक्काचे पंतप्रधान आवास योजनेतून घरकुलच्या तिसऱ्या टप्प्याचा हप्ता लवकरात लवकर मिळावा. घरकुलाकरिता अर्ज करणाऱ्यांचे सरकारी जागेवरील अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबत नगर परिषदेने यांनी महसूल कार्यालयात पाठपुरावा करावा तसेच नवीन घरकुल मागणीचे अर्ज आलेल्या लाभार्थींची मागणी पूर्ण करण्याकरिता प्रस्ताव नगर परिषदेने नगर विकास मंत्रालयाकडे पाठवावा, अशा विविध मागण्यांसाठी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी १५ मार्चपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. परंतु, तीन दिवस होऊनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे १७ मार्च रोजी तहसीलदारांना चांदूर बाजार भाजपने निवेदन देऊन, वेळेत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
तालुकाध्यक्ष मुरली माकोडे, उपाध्यक्ष सुमीत निभोंरकर, नंदू बर्वे, प्रदीप पंडागडे, महिला शहर अध्यक्ष अर्चना रुईकर, पूनम उसरबरसे, माधुरी साबळे, महिला आघाडी अध्यक्ष जयश्री पंडागडे, वंदना राऊत, नगरसेविका मीरा खडसे, प्रगती तायडे, माधुरी भगत, प्रदीप पंडागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.