अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अद्याप पाणीटंचाईची तीव्रता निर्माण झाली नसली तरी काही गावांमध्ये आतापासून पाण्यासाठी नागरिकांची पायपीट करावी लागत आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तालुकास्तरावर पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
आतापर्यंत चार ते पाच तालुक्यातूनच ही माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे टंचाई कृती आराखडा अद्याप तयार होऊ शकलेला नाही. दुसरीकडे पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी स्थानिक स्तरावर उपाययोजना करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात पाणीटंचाई नसल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले. मागील वर्षी चिखलदरा तालुक्यात ३२ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र तशी परिस्थिती नसल्याचा निर्वाळाही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.
बॉक्स
पूर्ण प्रस्ताव येताच आराखडा
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईची समस्या निवारणार्थ १४ पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना संबंधित तालुक्याचा टंचाई आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अजूनही बऱ्याच पंचायत समितींचे टंचाईबाबतचे आराखडे अप्राप्त आहेत. त्यामुळे सर्व पंचायत समितीकडून टंचाई आराखडा प्राप्त झाल्यानंतर एकत्रितरीत्या जिल्ह्याचा आराखडा तयार केला जाईल व तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मान्यतेसाठी सादर केला जाईल.