अमरावती : ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व गटविकास अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या आहेत.
कोरोना उपाययोजनांचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला. ग्रामस्तरीय कोरोना दक्षता व सनियंत्रण समितीमार्फत गावपातळीवर कोरोना नियमावली तसेच कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. मास्कचा वापर, नियमित हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे या त्रिसूत्रीचा काटेकोर अवलंब केल्यास संसर्ग कमी होण्यास मदत होऊ शकते. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून दंड वसुली करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत. वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सजग राहिले पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता, नियमित वाफारा घेणे, दैनंदिन योगा, सकस आहार याबाबत आरोग्य विभागाने जनजागृती करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची सकाळी आणि सायंकाळी वॉक टेस्ट घेण्याबाबतच्या सूचनासुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा यांनी सर्व गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत अधिनस्थ यंत्रणेला दिल्या आहेत.
बॉक्स
मेळघाटात केअर सेंटर
मेळघाटातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता, चिखलदरा तालुक्यातील चिखली या गावात तातडीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, परिसरात कोविड रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार केले जात आहे.