अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेसह सर्व ग्रामीण व नागरी आवास योजनांच्या उद्दिष्टांनुसार घरकुलांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
शहरी व ग्रामीण आवास योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी घेतला. प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी वेळोवेळी आढावा घेऊन कामे पूर्णत्वास न्यावीत. या कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. गरजू नागरिकांना आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी विशेष शिबिरे राबविण्यात यावी. या शिबिरांतून आवश्यक तिथे बक्षीसपत्र, रजिस्टर व नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. शिबिराचे नियोजन तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी करून त्याबाबत योग्य ती माहिती नागरीकांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व इतर योजनांचा सद्य:स्थिती पालकमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतली. झोपडपट्टी पुनर्विकास, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरांच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले. ज्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे अनुदान प्रलंबित आहे, ते त्वरित देण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले.महानगरपालिका क्षेत्रात बडनेरा, बेनोडा, निंभोरा, नवसारी, तारखेडा, म्हसला, राहाटगाव,अकोली आणि गंभीरपूर येथील भूखंडाची निवड करण्यात आली असून सदनिका बांधकाम सुरू असल्याचे संबंधित अधिका-यांनी सांगितले.यावेळी आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी उपस्थित होते.