शासनाचे दुर्लक्ष : संतोष बालेकर यांचा पत्रपरिषदेत सवाल अमरावती :अंदमान-निकोबारसह लक्षद्विप ही बेटे भारतीय संघराज्याचा अविभाज्य घटक असतांना तो भूभाग नकाशात का दर्शविला जात नाही, असा सवाल संतोष बालेकर यांनी उपस्थित केला.या संदर्भात त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. बालेकर यांनी केंद्र शासनाच्या दिल्ली स्थित सिमा निर्देशालय विभागाकडे ५५ तक्रारी पाठविल्या आहेत. मात्र, यासंदर्भात अद्यापपर्यंत शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आपण न्यायालयीन लढाई लढणार आहोत.असा दावा त्यांनी केला. भारतीय भूभागातील अंदमान-निकोबार व लक्षव्दिप ही बेटे भारताच्या नकाशात वगळण्यात येत असल्याचे संतोष बालेकर यांच्या निदर्शनास आले.विविध संघटना, शैक्षणिक आस्थापना, सरकारचे विविध मंत्रालय, अंगिकृत संस्था, विद्यापीठ, भारताचे मानचित्राचा उपयोग करताना ही बेटे नकाशात समाविष्ट करित नाहीत. त्या अनुषंगाने बालेकर यांनी १४ आॅगस्ट २००७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा चालविला आहे. समाजावर विपरित परिणाम अमरावती : या तक्रारी शासनाने संबधित विभागाकडे पाठविल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे बालेकर यांचे मत आहे. इतका महत्वाचा व राष्ट्रीय विषय असतानाही शासनाने आपल्या तक्रारी वजा माहितीकडे लक्ष दिले नाही. १३ वर्षांपासून आपण या विषयाचा पाठपुरावा करीत आहोत. मात्र, अद्यापपर्यंत न्याय मिळाला नसल्याचे बालेकर म्हणाले. नॅशनल मॅप पॉलिसी २००५ नुसार नकाशा प्रकाशित करताना नकाशात हे तिन्ही बेटे दर्शविणे आवश्यक आहे, असे नमुद आहे. तरीसुध्दा या विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज असल्याची माहिती बालेकर यांनी पत्रपरिषदेत दिली. भारतीय नागरिकांना देशाच्या नकाशाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. तसेच तिन्ही बेट भारताचाच एक भाग असल्याचे नागरिकांना समजणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांनी नकाशात ही बेटे न दर्शविल्याने नागरिकांना या बेटाविषयी माहिती नसल्याचे ते म्हणाले.
भारताच्या नकाशात अंदमान-निकोबार का नाहीत?
By admin | Updated: July 18, 2016 01:16 IST