‘जेलब्रेक’नंतर खबरदारी : बॉम्बस्फोट आरोपींना अंडा बराकीत हलविलेअमरावती : नागपूरनंतर आता भोपाळ मध्यवर्ती कारागृहात ‘जेलब्रेक’ झाल्यानंतर येथील मध्यवर्ती कारागृहात अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षारक्षकांना ‘जागते रहो’च्या सूचना देण्यात आल्या असून पोलीस यंत्रणेची पाषाणभिंतीलगत सतत गस्त सुरु आहे. अंडरवर्ल्ड दाऊद ईब्राहिम आणि अबू सालेम यांचे वाहनचालक सुद्धा येथे जेरबंद आहेत. तसेच मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना अंडा बराकीत हलविण्यात आले आहे.स्थानिक मध्यवर्ती कारागृह हे मुंबईचे आॅर्थर रोड, पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहानंतर अतिसुरक्षित मानले जाते. त्यामुळेच राज्यभरात गाजलेल्या घटना, प्रसिद्ध खटल्यातील आरोपींना येथे बंदिस्त ठेवण्यात आले आहे. ब्रिटिशकाळात या मध्यवर्ती कारागृहाची निर्मिती करण्यात आली असून या वास्तुला १५० वर्षांचा इतिहास आहे. माजी राष्ट्रपती संजीव निलम रेड्डी यांच्यासह स्वातंत्र्य लढ्यातील अनेक स्वातंत्र्यसंग्राम सेनानींना येथे बंदिस्त करण्यात आल्याची नोंद आहे. स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या नावे कारागृहाच्या आतील भागात स्मारक देखील साकारण्यात आले आहे. अशा अमरावती मध्यवर्ती कारागृहात आता मुंबई बॉम्बस्फोट, सराईत गुन्हेगार, मोका, पाकिस्तानी नागरिक, प्रसिद्ध खून खटल्यातील आरोपींना जेरबंद केले गेल्याची नोंद आहे. मनुष्यबळाचा अभाव ही कारागृह प्रशासनासमोर नेहमीची समस्या असली तरी ‘जेलब्रेक’च्या अनुषंगाने सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बंद्यांची आकस्मिक झाडाझडती सुरुअमरावती : कारागृहाचे वरिष्ठ तुरूंगाधिकारी अशोक जाधव यांनी बाह्यसुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून गस्त वाढविण्याची विनंती केली आहे. त्यानुसार फ्रेजरपुरा पोलिसांनी मंगळवारपासून कारागृहाच्या तटाला सुरक्षा प्रदान केली आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृह हे मध्यवस्तीत असल्याने आसपासच्या लोकवस्तीमध्येही पोलिसांनी सुरक्षिततेसाठी करडी नजर ठेवली आहे. तसेच कारागृहाच्या मागील बाजुकडून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग वळण रस्त्यावरही पोलीस बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. कारागृह प्रशासनाने प्रत्येक बराकीवर सूक्ष्म नजर ठेवली असून शस्त्रसज्ज पहारेकऱ्यांच्या मदतीला होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. या कारागृहात १०८७ बंदीसंख्या असून यात ३० महिला बंद्यांचा समावेश आहे. कारागृहात एकूण १६ बराकीत पुरुषबंदी जेरबंद ठेवण्यात आले आहेत. तसेच काही महिन्यांपासून अंडा बराकीत मुंबई बॉम्बस्फोटातील पाच आरोपी बंदिस्त आहेत. अंतर्गत सुरक्षेसाठी तुरुंगाधिकाऱ्यांकडून बंद्यांची आस्कमिक झाडाझडती घेतली जात आहे. कोणत्याही वेळी बंदीजनांची झाडाझडती घेतली जात असल्याने होणाऱ्या अप्रिय घटनेला आळा बसण्याचे हे संकेत मानले जात आहे.दाऊद ईब्राहीम, अबू सालेमचे वाहनचालक बंदिस्तअंडरवर्ल्ड दाऊद ईब्राहीम, अबू सालेम यांचे वाहनचालक मेंहदी हसन आणि हसन मिस्त्री हे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. मुंबईच्या आॅर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून या दोघांनाही सुरक्षेच्या अनुषंगाने अमरावती मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. भोपाळ ‘जेलब्रेक’ च्या पार्श्वभूमिवर अतिसुरक्षितता म्हणून बॉम्बस्फोटातील आरोपी मेंहदी हसन, हसन मिस्त्री यांना अंडा बराकित ठेवण्यात आल्याची माहिती जेलसूत्रांकडून मिळाली आहे.मनोऱ्यांवर सशस्त्र पहारेकरीकारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या दोन मनोऱ्यांवर चार सशस्त्र पहारेकरी तैनात करण्यात आले आहेत. ‘जागते रहो’च्या सूचना देताना हे सशस्त्र पहारेकरी राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्यावर बारकाईने लक्ष देत आहेत. तटावर पहारा देताना सुरक्षा रक्षकांना वाकीटॉकीवरुन वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळत आहे. ‘वॉकीटॉकी’ने सुरक्षेचा आढावाअमरावती मध्यवर्ती कारागृहात काही प्रमुखांकडे सुरक्षेच्या अनुषंगाने ‘वॉकीटॉकी’ देण्यात आल्या आहेत. वरिष्ठ ते कनिष्ठ कर्मचारी हे कारागृहाच्या सुरक्षेचा चौफेर आढावा ‘वॉकीटॉकी’ने घेत आहेत. मुख्य प्रवेशद्वारापासून तर आतील गोल, बराकी, भोजनकक्ष ते थेट मनोऱ्यापर्यंत संवाद साधला जात आहे.सुरक्षा रक्षकांची गस्त वााढविली आहे. सशस्त्र पहारा देखील सुरु आहे. बाह्यसुरक्षेसाठी पोलिसांना पत्र देण्यात आले असून तटाच्या बाजुला पोलीस संरक्षण देत आहेत. सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.- अशोक जाधववरिष्ठ तुरुंगाधिकारी
कारागृहाच्या सुरक्षेत वाढ
By admin | Updated: November 3, 2016 00:10 IST