पान २
ब्राम्हणवाडा थडी : पूर्णा प्रकल्प पाटबंधारे विभागाच्या चांदूर बाजार स्थित कार्यालयांमध्ये शुक्रवारी पूर्णा प्रकल्पाचे अधिकारी व पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात पूर्णा प्रकल्पाच्या सिंचनक्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे सुतोवाच अधिकाऱ्यांनी केले.
पाण्याचे नियोजन, सिंचनासंबंधी शेतकऱ्यांच्या अडचणी, वसुलीचे नियोजन, कालवा दुरुस्तीचे कामे, बंद असलेल्या पाईप लाईन सुरू करणे यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामधील पाईप लाईन बंद, तर काही शेतकऱ्यांच्या शेतामधील पाईप लाईन लिकेज असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय होऊन पाणी वाया जात आहे. प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी प्रकल्पातून सोडलेले अर्धे पाणीही उपलब्ध होत नाही, अशी माहिती पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्णा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत लोडे यांना दिली. यावर लवकरच पाईप लाईन दुरुस्तीचे कामे पूर्ण करू व सिंचनाचे क्षेत्र वाढवू, पाण्याचा अपव्यय होणार नाही याबाबत उपाययोजना करू, वसुलीचे नियोजन, प्रकल्पातून पाणी सोडण्यापूर्वी पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांना माहिती व वेळापत्रक दिले जाईल, कालवा दुरुस्तीच्या कामांना गती देऊ, असे सांगण्यात आले. या बैठकीला पूर्णा प्रकल्प पाणी वापर संस्थेचे सुनील दामेधर, अरविंद माधवकर, संजय पकळे, किशोरसिंह गहलोद, दिलीप चौधरी, प्रमोद देशमुख, प्रकाश मानकर, नंदकिशोर जोशी, अनिल देशमुख, प्रशांत चर्जन, सुधीर महल्ले, धनंजय वांगे, तर पूर्णा प्रकल्पाचे आर.एस. मोहिते, एस.बी. पंडित, गौरखेडे, भटकर, मंडपे हे उपस्थित होते.