कोरोनावर उपचार घेतलेला काळा ठरला आरोग्यास अपायकारक : गरम औषधीने केला घात
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : गरम पाण्याचा वापर आणि उष्ण औषध घेतले, तर कोरोना होत नाही, या समजातून अनेकांनी गावठी औषध-काढ्यांचा वापर केला. गत एका वर्षात उन्हाळ्याच्या काळात चहा, गरम पाणी आणि उष्ण असलेला काढा वापरला. यामुळे कोरोना बरा झाला नाही, उलट मूळव्याधीचा त्रास अधिक वाढला आहे. तालुक्यात एका वर्षात तब्बल साडेतीन हजार महिला व पुरुषांना मूळव्याध झाला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
केंद्र व राज्य शासनाने गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन घोषित केला. प्रत्येकाला आपल्या जिवाची व कुटुंबाची काळजी असल्याने अनेकांनी उपाय शोधणे सुरू केले. कुणी सकाळी व सायंकाळी उन्हाळ्यात गरम पाणी पिणे, सोबतच सकाळपासून दिवसभर चार ते पाच वेळा चहा पिणे, उष्ण काढा घेणे, उष्ण असलेले पदार्थ दिवसभर सेवन करणे असे प्रकार शहरासह ग्रामीण भागात एक वर्षात विशेषत: उन्हाळ्यात वाढत गेले.
साडेतीन हजार वाढले मूळव्याधीचे रुग्ण गतवर्षी उन्हाळ्यात वाढलेले उच्चांकी तापमान, त्यातच आपल्याला कोरोना होऊ नये म्हणून अनेकांनी उष्ण औषध घेतले. त्यात उष्ण काढ्याचा वापर अधिक केला गेला. गरम औषधीमुळे मूळव्याधीचे प्रमाण अधिक वाढले आहे. धामणगाव तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रे, आठ उपकेंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयातही मूळव्याधीच्या रुग्णाची नोंद झाली आहे. या रुग्णांना मागील दोन महिन्यांत धड बसता येत नाही व उठता येत नाही. तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांप्रमाणे मूळव्याधीचे रुग्णांचे प्रमाण अधिक वाढले आहे.
कोट
सतत बदलत जाणाऱ्या जीवनशैलीसोबतच कोरोनाची वाढत्या प्रमाणात घेतलेली औषधे शरीरासाठी घातक ठरू शकतात. डॉक्टर सल्ल्याशिवाय मूळव्याधीचे कोणतेही औषध घेऊ नये हीच विनंती.
- डॉ. हर्षल क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे