अमरावती : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी चालविलेला खेळ थांबवून कारभार सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेतून दिला आहे.
एमपीएससीने १४ मार्च रोजी आयोजित परीक्षा आता २१ मार्च रोजी घेण्याचे नियोजन चालविले आहे. मात्र, यापूर्वी वर्षभरात पाच वेळा परीक्षा स्थगित करण्याचा खेळखंडोबा शासनाने थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. काही तरुणांनी वयांची मर्यादा ओलांडली आहे, तरीही एमपीएससी वेळेत परीक्षा घेत नाही. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांत समन्वयाचा अभाव आहे. याचा फटका स्पर्धा परीक्षार्थ्यांना बसत आहे. एमपीएससी आयोगाकडे दोनच अधिकारी कार्यरत असून, येथे सुमारे १० अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. आयोगाचे अध्यक्ष आणि शासन यांच्यात वाद असल्याची बाबही यावेळी विश्वकर्मा यांनी लक्षात आणून दिली. शासनाकडून आयोजित विविध परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्या, अशी मागणी त्यांनी केली. महापोर्टलने यापूर्वी घेतलेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाले असून, तरीही चौकशी नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही, असा आरोप वंचितने केला आहे. मराठा आरक्षणाच्या नावे एमपीएससी परीक्षांची बोळवण चालविली असून, हा विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याची बाब आहे, असा आरोप करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र पातोडे, अलीम पटेल, सिद्धार्थ गायकवाड, नीशा शेंडे, शैलेश गवई, विद्या वानखडे आदी उपस्थित होते.