२० प्रवासी बचावले : चालकाचे प्रसंगावधान
चुरणी : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गुगामल वन्यजीव विभागातील अकोट-धारणी मार्गावर खासगी बस कलंडून दीडशे फूट खोल दरीच्या तोंडावर दोन चाकांवर उभी झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने यामधील २० प्रवाशी थोडक्यात बचावले. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात घडला.
एमएच १२ एच बी १९९९ ही खासगी बस अकोटवरून धारणीकडे चार वाजता येत होती. पण, ढाकणा अकोट मार्गावर ही बस दीडशे फुट खाईत चालकाच्या सतर्कतेने पडता-पडता वाचली अन् २० प्रवाश्यांचे प्राण वाचले. अकोट ते धारणी हा नागमोडीच्या घाटवळणाचा रस्ता असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची निगा राखली जाते. या रस्त्याची गुणवत्तेअभावी चाळणी झाली आहे. ८० किलोमीटरचा हा घाट अतिशय धोकादायक वळणांचा आहे. आदिवासी भागात रोजगाराची कोणतीही साधने उपलब्ध नसल्यामुळे स्थलांतरित कुटुंबे ढाकणा-अकोट मार्गाचा वापर करीत आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या नियमानुसार अतिसंरक्षित जंगलात बांधकामाची कोणतीही कामे करता येत नाही. पण, गेल्या पाच-सात वर्षात या रस्त्यांवर सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कोट्यवधीचा निधी टप्प्याटप्प्याने खर्च केला, पण अकोट-धारणी मार्गाचे भाग्य अद्याप फळफळले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.