वनपरिक्षेत्र फिरत्या पथकाची कारवाई, लाकडाचे मूल्यांकन सुरू, कडुनिंब, बाभळीचे अवैध लाकूड ताब्यात
अमरावती : बडनेराच्या जुनीवस्तीतील अलमासनगर भागात विनापरवानगी वाहतुकीचा अवैध लाकूडसाठा ताब्यात घेण्याची कारवाई रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास करण्यात आली. वनपरिक्षेत्र फिरत्या पथकाने ही कारवाई केली असून, जप्त लाकडाचे मूल्यांकन करण्यात येत आहे. ताब्यातील कडुनिंब, बाभळीच्या लाकडाची किंमत ५० हजारांवर असल्याची माहिती आहे.
अमरावती शहरात अन्य जिल्ह्यातून अवैध कटाई, विनापरवानगी वाहतूक तसेच चोरट्या मार्गाने बेसुमार लाकूड आणले जाते. लाकूड तस्करीचे मोठे रॅकेट आहे. खुल्या जागा, शासकीय जागेवर विनापरवानगी वाहतुकीचा अवैध लाकुडसाठा जप्त करण्याची शक्कल तस्कर लढवितात. त्याअनुषंगाने बडनेरा जुनीवस्तीच्या अलमासनगरच्या निवासी भागात अवैध लाकूडसाठा ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती वनविभागाच्या आरएफओ फ्लाईंग स्क्वॉडला मिळाली होती. विभागीय वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमाेडे यांच्या मार्गदर्शनात फिरत्या पथकाचे प्रमुख प्रशांत भुजाडे यांच्या चमूने बडनेरात धाडसत्र राबविले. यात खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात कडुनिंब, बाभूळ प्रजातीचा लाकूडासाठा असल्याचे या चमूच्या निदर्शनास आले.
दरम्यान, हा लाकूडसाठा कुणाचे आहे, याचा शोध घेण्यात आला. प्रारंभी या भागातील नागरिकांनी असहकार्य दर्शविले. काही वेळाने लाकूडसाठा असलेल्यांचा शोध घेण्यात आला. घटनास्थळी १५० नग लाकूड असल्याने मू्ल्यांकन करण्यात अडचणी आल्या. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. अन्सार खान व्यक्तीच्या मालकीचे आडजात लाकूड असल्याचे स्पष्ट झाले. ही कारवाई प्रशांत भुजाडे यांच्या नेतृत्वात वर्तुळ अधिकारी वानखडे, वनपाल पी.डी. काळे, चंद्रकांत मानकर आदी वनकर्मचाऱ्यांनी केली.
----------------
ताब्यात घेण्यात आलेला लाकुडसाठा हा खासगी व्यक्तिंचा आहे. त्यामुळे लाकडाचे बाजारमूल्य काढण्यासाठी मूल्यांकन केले जात आहे. विनापरवानगी वाहतुकीने हे लाकूड आणले गेले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार दंड आकारला जाईल,
- प्रशांत भुजाडे, आरएफओ, फिरते पथक, अमरावती.