वाहतूक विभागाचे दुर्लक्ष : अपघाताला आपसुकच निमंत्रणअमरावती : पंचवटीनजीकच्या एका हॉटेलसमोर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची अवैध पार्किंग खुलेआम लागत आहे. मात्र वाहतूक विभागाने दुर्लक्ष चालविलेले आहे. एका मंगल कार्यालयापासून पुढे हरदेव ट्रॅव्हल्सपर्यंत दुचाकी-चारचाकींची मोठी रांग लागते. या पदपथावर व्यावसायिकांची अवैध पार्किंग केली जाते. या मार्गावरील हॉटेलला स्वत:ची पार्किंगची जागा नसल्याने येथे येणाऱ्या प्रत्येकांचे वाहन अवैधपणे उभे केले जाते. यातही येथील पार्किंग अस्ताव्यस्त असल्याने अपघाताला निमंत्रण मिळते. दुचाकी पाठोपाठ चारचाकी वाहनांची रांग लागत असल्याने पादचाऱ्यांना मात्र रस्त्यावरुन जावे लागते. या भागात मोर्शी मार्गे धारणाऱ्या अनेक टॅक्सी उभ्या केल्या जातात. पंचवटी चौकातील हॉटेल्सपासून ते पुढे ट्रॅव्हल्स आॅफिसपर्यंत पार्किंगच नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात. इमारतींना मंजुरी देताना पालिका पार्किंग व्यवस्थेकडे का कानाडोळा करते? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. नजीकच्या ट्रॅव्हल्स कार्यालय आणि हॉटेलसमोरही दुचाकींच्या रांगा लागत असल्याने नियंत्रित वाहतुकीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. (प्रतिनिधी)
पंचवटी चौकात पदपथावर अवैध पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2016 01:03 IST