अमरावती: मोबाईल शाॅपीआड चालणाऱ्या गॅस रिफिलिंगच्या अवैध धंद्यावर नांदगाव पेठ पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. नांदगाव पेठ येथील शासकीय वसाहत गल्ली क्र. १ मधील रोमाना मोबाईल शॉपीमधून गॅस रिफिलिंगच्या साहित्यासह तब्बल ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत शाबीर लष्कर व एक महिला (दोघेही. रा. शासकीय वसाहत नांदगाव पेठ) यांच्याविरुद्ध जीवनाश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
नांदगाव पेठचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांना त्याबाबत माहिती मिळाली होती. त्याबाबत पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनादेखील देण्यात आली. यावेळी शाबीर लष्कर याच्या घरात २३ भरलेले व ३५ रिकामे असे एकूण ५८ अवैध गॅस सिलेंडर, रिफिलिंगसाठी वापरण्यात येत असलेले साहित्य, दोन इलेक्ट्रिक वजनकाटे असा मुद्देमाल आढळून आला. ते जप्त गॅस सिलेंडर नांदगाव पेठ येथील अधिकृत गॅस एजंसीकडे सुपुर्द करण्यात आले.