परिसरात मोठी टोळी सक्रिय : सकाळीच लावली जाते विल्हेवाट, सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत
आसेगाव पूर्णा : सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चांदूर बाजार अंतर्गत येणाऱ्या आसेगाव पूर्णा ते चांदूर बाजार मार्गालगत बाभळीच्या मोठ्या झाडांची कत्तल गत दोन महिन्यांपासून केली जात आहे. परिसरात मोठी टोळी सक्रिय झाली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. झाडांच्या कत्तलीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. वृक्षलागवड योजना ही यामुळे फार्स ठरली आहे.
आसेगाव पूर्णा ते चांदूर बाजार मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बाभळीची मोठी झाडे आहेत तसेच सामाजिक वनीकरण विभागामार्फतदेखील निंब, पिंपळ, वड यासारख्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील दोन्ही बाजूंनी असलेल्या बाभळीच्या झाडांची भल्या पहाटे कटर मशीनद्वारे कत्तल करून तोडलेल्या झाडाची विल्हेवाट लावली जाते तसेच झाडांचा बुंधा (खोड) हे माती व दगड व त्यावर काडी-कचरा टाकून झाकला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून होत असलेल्या अवैध वृक्षकटाईची अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाला खबर नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या ‘आशीवार्दा’ने हा वृक्षतोडीचा प्रकार चालू तर नाही ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
अशी होते अवैध कत्तल
बाभळीच्या झाडांची कत्तल ही कटर मशीनद्वारे केली जाते. दोर, कुऱ्हाड व इतर साहित्यांसोबतच एक मोठे वाहन वापरले जाते. ही अवैध वृक्षतोड मोहीम ही भल्या पहाटे अंमलात आणली जात असून, वाहनात लाकडे टाकल्यानंतर तोडलेल्या लहान फांद्याची एका बाजूला ढिगार लावून तोडलेल्या झाडाच्या परिसर व्यवस्थित केला जातो. चोरी कुणाच्याही लक्षात येऊ नये, याची चोरांकडून खबरदारी घेतली जाते.
कारवाईची मागणी
आसेगाव ते चांदूर बाजार मार्गावर रोज होणाऱ्या बाभळीच्या झाडांच्या कटाईची संबंधित विभागाने दखल घेऊन चोरट्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह पर्यावरणप्रेमींनी केली आहे.