गणेश वासनिक -
अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ७०१ किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यास ऑनलाईन दंड आकारला जाणार आहे.
अपघात रोखण्यासाठी महामार्गावर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विदर्भ-मराठवाड्यासह अहिल्यानगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. या महामार्गावर कारसाठी ताशी किमान १२० कि.मी. तर ट्रकसाठी ८० अशी वेगमर्यादा दिली आहे. मात्र त्याचे उल्लंघन होताना दिसते.
तिसरा डोळा ठेवणार नजरसमृद्धी महामार्गावर लहान-मोठ्या वाहनांची वेगमर्यादा किती? यावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. प्रत्येक १ किमी अंतरावर एक कॅमेरा बसवला जाणार आहे. किमान एक हजार कॅमेरे या महामार्गावर लागणार असून, त्याकरिता एमएसआरडीसीने दोन नामांकित कंपनीसोबत करार केला आहे.
...तर होणार ऑनलाइन दंडया महामार्गावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे बारीकसारीक बाबींवर लक्ष ठेवणार आहेत. एक कॅमेरा ५०० मीटर परिघातील चित्रण करणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम तयार करून बघितली जाणार आहे. महामार्गाने प्रवास करताना नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित चालकांना ऑनलाईन दंड निश्चित केला जाणार आहे.
दरमहा ११ लाख वाहने धावतातमहामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथून नागपूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने धावत आहेत. अल्पकाळात वाहनांची वर्दळ वाढली असून, लहान-मोठी अशी दरमहा ११ लाख वाहने धावत असल्याचा अंदाज आहे.
इतर महामार्गांच्या तुलनेत अवजड वाहनांसाठी जादा टोल असतानासुद्धा कमी वेळेत गंतव्य ठिकाणी पोहोचता येत असल्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याची माहिती नागपूर येथील एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता गजानन पळसकर यांनी दिली.
वाहने थांबविता येणार नाहीतनागपूर ते मुंबईपर्यंत प्रवास ८ तासांत पूर्ण होत आहे. त्यामुळे या महामार्गावर कर्नाटक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील वाहने मोठ्या प्रमाणात धावतात. आता वेगमर्यादेचे उल्लंघन आणि वाहने थांबविण्यासंदर्भातील मनमानीवर सीसीटीव्हीमुळे चाप बसणार आहे.