पतीने दिली धमकी : पतीच्या छळाला कंटाळली विवाहिताअमरावती : सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नाच्या बेडीत अडकलेली विवाहिता आता पतीच्या छळाला कंटाळली आहे. ‘मुलगी झाली तर जीवानिशी मारुन टाकेन’ अशी धमकी पतीने दिली होती. त्यानंतर मुलगा झाला तरी पतीकडून अत्याचार कमी झाला नाही, असा आरोप पत्नीने केला आहे. सविता रुपेश निस्वादे, असे पीडित विवाहितेचे नाव असून पतीने मारहाण केल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सविता रुपेश निस्वादे हिचे लग्न १३ मे २०१३ रोजी पारडशिंगा गावात आयोजित सामूहिक विवाह सोहळ््यात झाले. त्यानंतर ५ महिने सासरच्या मंडळीकडून चांगली वागणूक मिळाली. या काळात सविता गर्भवती राहिली. सासरच्या मंडळीने मुलगा पाहिजे असा तगादा लावून सविताचा छळ सुरु केला. त्या परिस्थितीत मुलगी झाली तर सासरची मंडळी काय करेल, याच विवंचनेत सविता होती. सविताला वडील व भाऊ नसल्याने ती आईच्या आधारावर जगत होती. याचाच गैरफायदा घेऊन सासरची मंडळी अधिक छळ करीत असल्याचे सविताच्या लक्षात आले. ‘आईकडून ५० हजार रुपये आण’, असा तगादा लावून सासरची मंडळी सविताला मारहाण करीत होती. मुलगी झाली तर तुला जिवानिशी मारुन टाकेन, अशा धमक्या पतीने सविताला दिल्या होत्या. गर्भवती असतानाच तिच्या सासरच्या मंडळीने सविताच्या अंगावरील दागिने काढून घेतले. सविताची प्रसूती झाल्यावर तिला मुलगा झाला. मात्र, तिचा छळ कमी झाला नाही. मुलगा झाला तरी सासरच्या मंडळीने सविताचा छळ करणे सुरुच ठेवले होते. त्यावेळी पती व नातेवाईक रजनी शियाले यांनीही सविताला मारहाण केली होती. त्यासंदर्भात तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतरही छळ होत असताना, पुन्हा चार ते पाच तक्रारी सविताने पोलीस ठाण्यात केल्या होत्या. मात्र पतीवर कोणतीही कारवाई झाली नाही, असे सविताने सांगितले. त्यानंतर एकदा सविता पतीसोबत मोटरसायकलवर जात असताना पतीने सविताला मोटरसायकलवरुन खाली पाडले होते. त्यामध्ये सविताच्या हाताचे हाड मोडले होते. असाच छळ सुरु असताना सविताचा दीर गजानन निस्वादे याने सविताला तक्रार मागे घेण्यासाठी फोनवर धमक्या दिल्या, असा आरोप पीडित सविताने केला आहे. एक महिन्यापूर्वी दीर गजानन याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यावर सविताच्या सासूने जेवणात विष कालवून तिला मारण्याचा प्रयत्नसुध्दा केला. त्यावेळी पतीने सविताला खोटे बयाण देण्यास भाग पाडले होते. त्यानंतर अत्याचाराची सीमा गाठत सविताच्या पतीने तिच्या बाळाला मारण्याचा प्रयत्नसुध्दा केला. यासंदर्भात सविताने वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्यापर्यंत तक्रारीवरून कोणतीही कडक कारवाई करण्यात आली नाही, असे सविताने सांगितले. सद्यस्थितीत सविता जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १३ मध्ये उपचार घेत असून तिथेही तिला त्रास देण्याचा प्रयत्न सुरूच आहे. हा अत्याचार दूर करण्याची मागणी कंटाळलेल्या सविताने पोलिसांकडे केली आहे. (प्रतिनिधी)
मुलगी झाली तर जीवानिशी मारुन टाकेल
By admin | Updated: November 3, 2014 23:19 IST