भोकरबर्डीत प्रथम पूजन : बाहेर रोटी कार्यक्रमात स्थापनाधारणी : मेळघाटसह सातपुडा पर्वत रांगेत तापी नदीखोऱ्यात राहणारा मूळ निवासी आदिवासी कोरकू समाज. या समाजाचे अस्तित्त्व रामायण काळापासून असल्याचे येथील संस्कृती व पूजा पद्धतीचे अभ्यास केल्यास कक्षात येतो. येथील कोरकू समाज आजही होळी व रंगपंचमीच्या मुख्य सणात मेघनाथबाबा व कुंभकर्णाची पूजा मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा करतो. परंतु या समाजाची विशेष नोंद आजही शासन दप्तरी नसल्याचेही दिसून येते. म्हणून मूलनिवासी असतानाही कोरकू समाजाची विशेष ओळख आदिवासी या शब्दापलिकडे झाली नाही. सर्वच धर्म व समाजाला एक विशेष ओळख असण्यासाठी त्यांचा झेंडा असतो. झेंडा हा आदर्श समोर असल्यास उत्साह व आनंदासह स्वाभिमान जागविण्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो. या संकल्पनेला समोर ठेवूनच मध्य प्रदेशातील आ. राजेंद्र दादू रा. कानापूर ता. खकनार येथे त्यांचे वडिलांचे तेरवीचे कार्यक्रम नुकतेच २ फेब्रुवारी रोजी पार पडले होते. या तेरवीला हजारो लोकांच्या उपस्थितीत कोरकू समाजाची ओळखसाठी स्वतंत्र झेंड्यांची कल्पना मांडण्यात आली होती. यात पांढरा शुभ्र रंगाचा त्रिकोणी झेंडा त्यावर मुठवा देव यांची मूर्तीसह जय मुठवा लिहिण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. याच निर्णयाची पूर्तीसाठी ९ फेब्रुवारी रोजीे तालुक्यातील भोकरबर्डी या मध्यप्रदेशातील सीमेवरील गावात परंपरागत बाहेर रोटी कार्यक्रमात या झेंड्याची सर्वप्रथम स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते मुठवा देवाची पूजा करुन ध्वजस्तंभ उभारण्यात आले आणि कायदा अंतर्गत कोरकू समाजातील सर्व गावात देवी देवतांचे धार्मिक स्थळांची नोंदी असलेला नमुना - ८ ग्रामपंचायत कार्यालयाद्वारे गावातील आडा पटेल फुलचंद जांबेकर यांना देण्यात आले. यावेळी माजी आमदार पटल्या गुरुजी, अध्यक्ष आदिवासी समाज विकास संघटना, रामू जारेकर गुरुजी, कोषाध्यक्ष आणि साखरे गुरुजी सचिव यांची प्रमुख उपस्थिती होती. या झेंड्याची भूमिका सर्वप्रथम आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त साखरे गुरुजी यांच्या सुपिक डोक्यात आली. त्यांनी झेंड्यामुळे आपसात मतभेद विसरुन एकतेचा बी रोवला जाईल व हा झेंडा प्रत्येक कार्यक्रमात लावण्याचा निर्धार केला. त्याची पूर्तता त्यांच्याच पैशातून गाव भोकरबर्डी येथून झाल्याने हा उपक्रम मेळघाटात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी आपले विचार मांडताना व्यक्त केला. मेळघाटातील सर्व गावात या आदिवासींचा स्वाभिमान व ओळख निर्माण करणारा ‘मुठवा झेंडा’चा वितरण करण्याचा निर्धार माजी आमदार व आदिवासी समाज विकास संघटनेचे अध्यक्ष पटल्या गुरुजी यांनी केला. कार्यक्रमासाठी ब्रिजलाल पटेल, राजकमल साखरे, छोटेलाल भिलावेकर, लक्ष्मण जांबेकर, रामलाल कास्देकर, हरणसिंग पटोरकर, राजपाल सावलकर, बिसराम सावलकर, सज्जुलाल भिलावेकर, काल्या फालतु यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)
कोरकू समाजाला स्वतंत्र झेंड्यांची ओळख
By admin | Updated: February 12, 2016 00:57 IST