पान २
अपघाताची शक्यता : नवा रस्ता तयार करण्याची मागणी
मोर्शी : हिवरखेड ते डोंगर यावली या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करून नव्याने डांबरी रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी विदर्भ ग्राहक सरंक्षण संघटनेचे आनंद घोंगडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आमदार देवेंद्र भुयार, खासदार रामदास तडस यांना निवेदन दिले. हा रस्ता वृक्षांनी वेढला आहे. दुतर्फा झाडांचा महिरप असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. परिणामी, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
मोर्शी येथून आठ किमी अंतरावर सातपुड्याच्या कुशीत वसलेले श्रीक्षेत्र सालबर्डी गाव पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेलगत दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. या ठिकाणी देशभरातील भाविक छोट्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीला गर्दी करीत असतात. नागपूर, काटोल, वरूड येथून येणाऱ्या भाविक तसेच पर्यटकांना सालबर्डी जाण्यासाठी हिवरखेड ते डोंगर यावली ते सालबर्डी हाच मार्ग असल्याने वाहनचालकांना जातेवेळी जीव मुठीत घेऊन जावे लागते. हा रस्ता अतिशय अरुंद असून, झाडाझुडपांनी वेढलेला आहे. समोरासमोर येणारे वाहन काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. झाडाझुडपांनी वेढलेल्या या रस्त्याने समोरून येणारी वाहने दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते. या गंभीर समस्येची दखल घेऊन हिवरखेड ते डोंगर यावली मार्गावर दोन पुलांची निर्मिती आणि रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
------------------