निवेदन : अन्यथा आंदोलनाचा इशारा
मोर्शी : नजीकच्या हिवरखेड येथील बसस्थानक परिसरात गतिरोधक बसविण्यात यावे. अन्यथा बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा हिवरखेडचे सरपंच विजय पाचारे यांनी दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग यंत्रणा व आमदार देवेंद्र भुयार यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
हिवरखेड येथे नव्याने रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले. मात्र, या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात आले नाही. परिणामी, अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. व्यापारी व मजुरांची बसस्थानक परिसरातील हॉटेल्समध्ये नेहमीच वर्दळ असते. याठिकाणी पेट्रोल पंपाचीसुद्धा निर्मिती करण्यात आली. मोठी वाहने याठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी येतात. याठिकाणी संत्रा तोडण्यासाठी बाहेरगावाहून मजूर दाखल होतात. तथापि वरूडहून भरधाव अमरावतीकडे जाणाऱ्या वाहनाने बऱ्याच जनावरांचे प्राण घेतले आहे. दुचाकी वाहनांचासुद्धा अपघात होऊन बऱ्याच लोकांना प्राण गमवावे लागले. यापार्श्वभूमीवर येत्या आठ दिवसांत हिवरखेड बसस्थानक परिसरात गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.