परिस्थितीने कलादालन दुरावले : शिक्षकांच्या साहाय्याने योग्य वाटचाल
मोर्शी : आयुष्यात गुरूचे महत्त्व किती, हे हिवरखेड या लहानशा गावातील राकेश नरेंद्र ढोंगे या युवकाच्या वाटचालीवरून सिद्ध होते. व्यक्तिचित्र हुबेहुब रेखाटण्याचे त्याचे कसब शिक्षकांनी जोखले आणि बी.ए.चे शिक्षण सोडून कलाक्षेत्राकडे वळण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याच्या कलागुणांमुळे हिवरखेडच्या या कलावंताचा मुंबईत आमदारांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
राकेश ढोंगे याचा बालवयापासून व्यक्तिचित्र रेखाटण्याकडे कल होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी पाठबळ नव्हते. यामुळे त्याने बारावीनंतर मोर्शी येथे भारतीय महाविद्यालयात बीए भाग (1) मध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या अतिथींचे रेखाचित्र रेखाटून त्यांना भेटही दिले होते. तत्कालीन प्राचार्य गोपीचंद मेश्राम व कार्यालयीन कर्मचारी राज्य ग्रंथ निवड समितीचे सदस्य रूपेश मेश्राम यांच्यासह काही प्राध्यापक मंडळींनी त्याची चित्रकला हेरली. रूपेश मेश्राम यांनी त्याला अमरावती येथे चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेण्याबाबत मार्गदर्शन केले आणि प्रसंगी आर्थिक मदत करण्याची तयारीही दर्शविली. त्यानुसार चित्रकला महाविद्यालयात फाउंडेशन कोर्सला राकेशने प्रवेश घेतला. त्याकरिता माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी त्याला सहकार्य केले. सध्या तो औरंगाबाद येथे शासकीय महाविद्यालयात कलेचे उच्चशिक्षण घेत आहे. त्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार या मान्यवरांची चित्र रेखाटून त्यांना मुंबई येथे जाऊन भेट दिली. त्याच्या चित्रकलेने प्रभावित होऊन आमदार नीलेश लंके यांनी राकेशचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आमदार देवेंद्र भुयार उपस्थित होते.