धारणी : रक्ताक्षय व हिमोग्लोबीन कमी असतानाही गर्भवती महिलेची तालुक्यातील बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या झिलांगपाटी उपकेंद्रात यशस्वी प्रसूती करण्यात आली. ‘रेफर टू धारणी’ व ‘रेफर टू डफरिन’ला फाटा देत स्थानिक डॉक्टरांनी हे अतिजोखमीचे कार्य पार पाडले. त्या ३२ वर्षीय विवाहितेने ३ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या सुदृढ मुलीला जन्म दिला.
मेळघाट आधीच बालमृत्यू व मातामृत्यूकरिता कुप्रसिद्ध आहे. मेळघाटात पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्ताक्षयाचे प्रमाण हे गंभीर असून, या कारणांमुळेच अधिक मातामृत्यू होतात. कमी वयात लग्न, दोन गर्भात अंतर न ठेवणे, जेवणात पोषक तत्त्वांची कमतरता, गर्भावस्थेत योग्य औषधोपचारास नकार, पिढीजात चालत आलेली परंपरा व अंधश्रद्धा इत्यादी बाबींमुळे आरोग्य सेवा देताना प्रचंड अडचणी निर्माण होतात.
अशीच एक अतिजोखमीची गरोदर माता प्राथमिक आरोग्य केंद्र बिजुधावडी येथे काही दिवसांपूर्वी पोहोचली. अनिता किसन भिलावेकर (३२) असे तिचे नाव. दुसऱ्यांदा गरोदर असलेल्या या मातेला नोंदणीपासूनच तीव्र रक्ताक्षयाची लक्षणे होती. तिचे हिमोग्लोबीनचे प्रमाण हे फक्त ६ ग्रॅम होते. नंतर पुन्हा ते प्रमाण घसरून फक्त ४.७ वर स्थिरावले. तिला उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे रक्त लावण्यासाठी संदर्भित करण्यात आले. परंतु कोरोनामुळे आधीच रक्ताचा तुटवडा असल्याने रक्त उपलब्ध झाले नाही. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता व सदर मातेचे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याने उपकेंद्र झिलांगपाटी येथील डॉ. अक्षय पिंपरे, आरोग्यसेविका धंदर, नेमाडे व आरोग्यसेवक खान यांनी घरीच तिचे हिमोग्लोबीन वाढवण्याचे ठरविले. सदर मातेला वारंवार आहार, आरामाविषयी समुपदेशन करण्यात आले. तिचा नियमित पाठपुरावा करण्यात आला. तिला गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवून देण्यात आले. तिला लाडू घरी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. तिला रक्त वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या गोळ्या पाच महिने नियमित खायला देण्यात आल्या. तसेच इंजेकशन आयरन सुक्रोज शिरेवाटे सोडण्यात आलेत.
२९ डिसेंबर रोजी प्रसुती
या प्रयत्नाने सदर मातेचे हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढले व तिने २९ डिसेंबर रोजी झिलांगपाटी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सुदृढ मुलीला जन्म दिला. याकरिता तेथील डॉक्टरांना जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत पवार, बिजुधावडी येथील वैद्यकीय अधिकारी दिनेश अंभोर, मोगर्दा येथील डॉ. सोनू कुंवारे यांच्या मार्गदर्शन लाभले.
--------------