आंदोलन: आरोग्य विभागातील कर्मचारी एकवटलेअमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे बुधवारी हेल्थ एम्प्लॉईज फेडरेशनसह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मुख्यालयातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेवकांचे मार्च ते जून २०१५ पर्यतचे वेतन अद्याप पर्यतही अदा केले नाहीत. थकीत वेतनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची थकीत वेतन त्वरीत देण्याची मागणी आंदोलन कर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव, तसेच अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. आंदोलनात जिल्हाध्यक्ष देवेंद्र शिंदे, संस्थापक अध्यक्ष जयंत औतकर, अभय गावंडे, विनोद डोंगरे, रजनिकांत श्रीवास्तव, शालीनी भाकरे, राजेश पणजकर, व हेल्थ एम्प्लॉईज फेडरेशनचे पदाधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा हेल्थ एम्प्लॉईज फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे. (प्रतिनिधी)
थकीत वेतनासाठी हेल्थ एम्प्लॉईज फेडरेशनचे धरणे
By admin | Updated: July 9, 2015 00:17 IST