अंजनगाव सुर्जी : नागरिकत्वाबाबत कर्तव्य आणि जागृतीची अद्यापही जाणीव नसलेल्या शहरात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्या ठिकाणी दररोजचा कचरा टाकायची सवय आहे. त्याठिकाणी कचरा उचललेला असो अथवा नको, तेथेच ढिगारा होईपर्यंत व सडका होईपर्यंत कचरा टाकला जातो व शहरात ठिकठिकाणी रस्त्यावरच असे ढिगारे पाहायला मिळतात. नियमित उचलला जात नसला तरी उपलब्ध साधनांमार्फत न. प. कर्मचारी हे कचरा त्यांच्या सोई उचलून नेत असत. परंतु आजपासून आरोग्य व सफाई कर्मचाऱ्यांसह बांधकाम, सुवर्ण जयंती विभाग आणि कार्यालयीन कर्मचारीही संपावर गेल्याने आरोग्याची प्रमुख समस्या तयार झाली आहे. नगरपालिकेकडे सफाई विभागात तीन ट्रॅक्टर, दोन घंटा गाड्या व एक मालवाहू आॅटो आहे. सद्यस्थितीत अपुरा असला तरी सफाई कर्मचारी या वाहनांद्वारे शहरात फिरून कचरा गोळा करीत राहतात व ढिगारे निर्माण होत नाहीत. पण या कर्मचाऱ्यांसह संपूर्ण दीडशेच्यावर कर्मचारी आज संपावर गेलेत. आधीच येथील मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार दर्यापूर न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांकडे आहे. त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडून अधूनमधून येथे येणाऱ्या दर्यापूर मुख्याधिकाऱ्यांकडून येथील कर्मचाऱ्यांचे प्रशासन चालविणे शक्य नाही. त्यातच नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्यासुद्धा निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण न. प. प्रशासन पांगळे झाले आहे. सफाई कर्मचाऱ्यांसोबतच बांधकाम विभागातील बंद कामामुळे जनतेने महत्त्वाचे बांधकामविषयक कागदपत्र व नाहरकत दाखले आदी ठप्प झाले आहेत. सुवर्ण जयंती विभागातील संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमुळे बचत गटांचे कर्जविषयक कामकाज थांबले आहे. विधानसभेच्या निवडणुकांची चाहुल लागली तरी शासनाला न. प. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करता आल्या नाहीत. त्याच्या परिणामामुळे न. प. कर्मचारी राज्यव्यापी संपावर गेले आहेत. संपाची व्यापकता मागण्यांची तीव्रता किती आहे याचा स्पष्ट पुरावा देते. न. प. कर्मचाऱ्यांच्या एकीमुळे पहिल्याच दिवशी या संपाचे प्रभावी परिणाम पाहायला मिळाले. जोपर्यंत कर्मचारी काम करतात तोपर्यंत त्यांचे काम लक्षात येत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य आणि सफाईविषयक कामकाज प्रभावित झाले. या संपाची पुढील दिशा काय? हे कळायला शासनाची भूमिका महत्त्वाची असली तरी संप लांबला तर त्याचे थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतील हे निश्चित आहे. (तालुका प्रतिनिधी)
पालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्याच्या समस्या
By admin | Updated: July 15, 2014 23:55 IST