आयुक्तांचे आदेश : हजेरी पुस्तिका नोंद प्रकरणअमरावती : किरणनगर प्रभागात दैनंदिन सफाई कर्मचाऱ्यांचे हजेरीबुक अवेळी भरुन मोठी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फे्रजरपुरा पोलिसांत आरोग्य निरीक्षक व दोन जमादारांविरूध्द (ब्युटप्युन) फौजदारी दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली आहे. ही कारवाई आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.आरोग्य निरीक्षक झेंगट व जमादार गोविंद संगले, सिरसिया यांच्याविरुध्द पोलिसांत फौजदारी कारवाईसाठी पत्र देण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील महिन्यात आ. रवी राणा व आयुक्त गुडेवार किरणनगर प्रभागात पाहणी दौरा करण्यासाठी गेले असता त्यांना पंचशिल ध्वज परिसरात अस्वच्छता, घाण दिसून आली. त्यामुळे आ. राणा यांनी महापालिका स्वच्छता विभागाबाबत नाराजी व्यक्त केली होती. हा प्रकार आयुक्तांच्या समक्ष घडल्याने महापालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली. दरम्यान आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी किरणनगर प्रभागातील अस्वच्छतेचे सूक्ष्म निरीक्षण केले असता सफाई कंत्राटदारांसोबत महापालिका आरोग्य विभागातील कर्मचारी देखील सामील असल्याचे लक्षात आले. आयुक्तांनी दोन दिवसांनंतर सकाळी सफाई कर्मचाऱ्यांचे हजेरीबुक तपासले असता त्यात नोंदी आढळल्या नव्हत्या. हीच बाब हेरुन कंत्राटदारांसोबत कर्मचाऱ्यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पश्चात हे प्रकरण पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयुक्तांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाचे अधीक्षक ए.टी. तिजारे यांनी आरोग्य निरीक्षक, दोन जमादारांविरुध्द फौजदारीसाठी फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली असून अद्याप पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले आहे. महापालिका प्रशासनाने याप्रकरणी आर्थिक हितसंबंध असल्याचे म्हटले असले तरी ते स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
आरोग्य निरीक्षक, दोन जमादारांविरुद्ध तक्रार
By admin | Updated: October 8, 2015 00:12 IST