वृक्ष लागवडीसाठी स्वत: करावा लागणार खर्चअमरावती : प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी उपलब्ध जागांवर वृक्षलागवड करणे गरजेचे असून शासनाने यासाठी विविध विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे. यासाठी कर्मचारी अधिकाऱ्यांना वृक्षलागवडीसाठी स्वत: खर्च करण्याचे लेखी आदेश शिक्षण विभागाने काढले आहे. शिक्षकांनी किमान पाच वृक्ष खरेदीच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.जिल्हा परिषद शिक्षण विभागाला १ जुलै रोजी शाळेसह परिसरात तसेच कार्यालयाच्या ठिकाणी वृक्षारोपण करावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. वृक्षारोपण करण्याबरोबरच त्यांचे संगोपन, ही काळाची गरज आहे. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून लावलेल्या प्रत्येक झाडांची शिक्षक-मुख्याध्यापकांना सर्वतोपरी काळजी घ्यावी लागणार आहे. या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांना वाटून दिली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या सुमारे १ हजार ६०० शाळांसह, नगरपरिषद, खासगी अनुदानित, खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांतील प्रत्येक शिक्षकाने स्वत: किमान ५ वृक्ष विकत घेऊन शाळेत, ई-क्लास जमिनी, गावाबाहेर, शिवारात, शेतावर, घरी, रस्त्याच्या दुतर्फा लावावीत, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात शाळांना दिल्यात. १ जुलैच्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली आहे. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे. लोकसहभागातून वृक्षारोपण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)
खातेप्रमुखांच्या सूचना : शिक्षकांना पाच वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
By admin | Updated: June 24, 2016 23:55 IST