पुसला / वरूड : पुसला येथील विश्वस्नेह सेवा आश्रमाचे संस्थापक तसेच परमहंस यशवंतबाबा शाश्वत अन्नदान ट्रस्टचे अध्यक्ष आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सभासद हभप भक्तदास ऊर्फ भाऊराव महाराज (९६) यांचे शनिवारी रात्री ११.३० वाजता निधन झाले.
भक्तदास महाराज हे मूळचे मध्यप्रदेशातील तिगाव मारूड येथील महल्ले परिवारातील होत. अविवाहित असताना त्यांनी पुसला येथे श्रीराव यांनी दिलेल्या जमिनीवर मठ उभारला. महाराजांचे मध्यप्रदेशसह विदर्भात मोठ्या प्रमाणावर भक्तगण असून, गत आठवड्यात त्यांची अचानक प्रकृती खालावल्याने हरिनाम सप्ताह सुरू करण्यात आला. शनिवारी रात्री आरतीनंतर त्यांनी देह त्यागला. त्यांनी ठरविलेल्या जागेवर विधिवत पूजाअर्चा करून समाधी देण्यात आली. आ. देवेंद्र भुयार, सरपंच धनराज बमनोटे यांच्यासह पुसला आणि वरूड तालुक्यातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.